बेळगाव लाईव्ह :सांबरा -अष्टे ब्रिज जवळ शेताला पाणी देण्यासाठी शेतकऱ्यांनी बळळारी नाल्याच्या ठिकाणी बसवलेल्या दोन पाण्याच्या मोटारी चोरट्यानी लंपास केल्याचा प्रकार आज बुधवारी सकाळी उघडकीस आला.
पाण्याच्या मोटारी चोरीला गेलेल्या शेतकऱ्यांची नावे काशिनाथ मारुती धर्मोजी आणि महादेव हणमंत कोकितकर अशी आहेत. सांबरा -अष्टे ब्रिज येथून वाहणाऱ्या बळळारी नाल्यातील पाणी शेतीला वापरण्यासाठी सांबरा आणि अष्टे गावातील अनेक शेतकऱ्यांनी पाण्याच्या मोटारी बसवल्या आहेत. त्यापैकी ब्रिज जवळ असलेल्या शेत असलेल्या काशिनाथ धर्मोजी आणि महादेव कोकितकर यांच्या मोटारी चोरीला गेल्या आहेत.
मागील वर्षी देखील याच महिन्यात सुरप्पा देसाई यांची पाण्याची मोटर चोरट्यानी लंपास केली होती. शेतकरी भरमा धर्मोजी आज पहाटे शेताला पाणी सोडण्याकरिता मोटार सुरू करण्यासाठी आले असता ती चोरीला गेली असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी तात्काळ त्याची माहिती तालुका पंचायत सदस्य काशिनाथ धर्मोजी यांना दिली. त्यांनी घटनास्थळी दाखल होऊन सदर प्रकार ग्रामपंचायतीच्या निदर्शनास आणून दिला.
तसेच चोरट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी केली. चोरीला गेलेल्या मोटारींप्रकरणी मारीहाळ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. या भागात बळळारी नाल्यावर शेकडो शेतकऱ्यांनी पाण्याच्या मोटारी बसवल्या आहेत.
तरी पोलीस खाते व ग्रामपंचायतीने पाण्याच्या मोटारी चोरीला जाण्याच्या प्रकाराची गांभीर्याने दखल घेऊन ताबडतोब ठोस कारवाई करावी आणि त्याला आळा घालावा, अशी जोरदार मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.




