बेळगाव लाईव्ह : शेतकऱ्यांच्या कृषी उत्पादनांना लाभदायक दर दिला द्यावा, शेतकऱ्यांना रस्ते, पाणी, वीज वगैरे शेतीसाठी आवश्यक मूलभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या जाव्यात वगैरे मागण्या आज भारतीय किसान संघ -कर्नाटक प्रदेश संघटनेच्यावतीने धरणे आंदोलनाच्या माध्यमातून राज्य सरकारकडे करण्यात आल्या.
भारतीय किसान संघ -कर्नाटक प्रदेश संघटनेच्यावतीने आज बुधवारी बेळगाव सुवर्ण विधानसौध समोर आपल्या विविध मागण्यांसाठी धरणे आंदोलन करण्यात आले. सदर आंदोलनामध्ये उत्तर कर्नाटकातील बेळगावसह धारवाड, हुबळी, गदग, कारवार वगैरे सात-आठ जिल्ह्यांमधील असंख्य शेतकऱ्यांचा सहभाग होता.
शेतकऱ्यांकडून उत्पादित केल्या जाणाऱ्या ऊस, भात, मका, जोंधळा भाजीपाला वगैरे कृषी उत्पादनांना लाभदायक योग्य हमीभाव दिला जावा. जलसिंचनाची समस्या दूर केली जावी. जंगल प्रदेशा नजीक असणाऱ्या शेतजमिनींना वन्य प्राण्यांपासून संरक्षण दिले जावे.
शेतकऱ्यांना चांगले, रस्ते वीज पुरवठा वगैरे आवश्यक मूलभूत सुविधा दिवे जावे वगैरे विविध मागण्यांसाठी छेडण्यात आलेल्या या अधिवेशनादरम्यान आंदोलनकर्त्यांनी निदर्शने करून आपल्या मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.
आंदोलन स्थळी बेळगाव लाईव्हशी बोलताना भारतीय किसान संघ -कर्नाटक प्रदेश संघटनेच्या कर्नाटक उत्तर प्रांताचे अध्यक्ष धारवाड येथील विवेक मोरे यांनी सांगितले की, शेतकऱ्यांना कोणतेही कृषी उत्पादन घेतले तरी अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. याला कारण म्हणजे ऊस, भात, मका, जोंधळा भाजीपाला वगैरे कोणत्याही कृषी उत्पादनांना सरकारकडून शेतकऱ्यांना लाभदायक असा दर दिला जात नाही.

या पद्धतीने आम्हा शेतकऱ्यांवर होणारा अन्याय सहनशक्ती पलीकडे गेला आहे. कृषी उत्पादनांना जो दर दिला जात आहे, त्यातून संबंधित उत्पादन घेण्यासाठी आलेला खर्च देखील निघेनासा झाला आहे. त्यामुळे यापुढे शेती करायची का नाही? असा शेतकऱ्यांना संभ्रम पडला आहे. यासाठीच आमची सरकारकडे मागणी आहे की एखादे कृषी उत्पादन घेण्यासाठी आम्हाला जितका खर्च सहन करावा लागतो त्याची किमान अर्धी किंमत तरी आम्हाला मिळावी.
जर असे झाले नाही तर आम्हा शेतकऱ्यांचे जगणे मुश्किल होणार आहे. सध्याचे उदाहरण द्यायचे झाल्यास प्रतिक्विंटल भाताच्या उत्पादनासाठी जर 4000 रुपये खर्च येत असेल तर सध्या बाजारात त्याला 2300 ते 2500 रुपये दर दिला जात आहे. हीच स्थिती ऊस, मका, जोंधळे वगैरे अन्य कृषी उत्पादनांच्या बाबतीत देखील आहे. या पद्धतीने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत असून असे झाल्यास देशाचा अन्नदाता म्हंटल्या जाणाऱ्या शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती सुधारणार तर केव्हा? असा सवाल मोरे यांनी केला.
तसेच शेतकऱ्यांच्या कृषी उत्पादनांना लाभदायक दर दिला द्यावा त्याचप्रमाणे शेतकऱ्यांना चांगले रस्ते, पाणी, वीज वगैरे शेतीसाठी आवश्यक मूलभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या जाव्यात. ऊस, भात, मका, जोंधळा भाजीपाला वगैरे कृषी उत्पादनांना लाभदायक योग्य हमीभाव दिला जावा. जलसिंचनाची समस्या दूर केली जावी. जंगल प्रदेशा नजीक असणाऱ्या शेतजमिनींना वन्य प्राण्यांपासून संरक्षण दिले जावे वगैरे विविध मागण्यांसाठी आम्ही आज आंदोलन करत आहोत, असेही त्यांनी स्पष्ट केले.




