बेळगाव लाईव्ह : बेळगावहून सीआरपीएफ केंद्र तोराळीकडे जाणाऱ्या केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या भरधाव वाहनाने दुचाकीला धडक दिल्याने घडलेल्या अपघातात एक दुचाकीस्वार शेतकरी ठार झाल्याची घटना काल सकाळी बेळगाव -चोर्ला रोड वरील रणकुंडये क्रॉस, पेट्रोल पंपनजीक घडली.
अपघातात ठार झालेल्या शेतकऱ्याचे नांव नामदेव गुंडू नाकाडी (वय 67, रा. चव्हाट गल्ली, बैलूर, ता. बेळगाव) असे आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नामदेव नाकाडी हे काल मंगळवारी सकाळी 10:30 च्या सुमारास दुचाकीवरून बैलूर येथून बामणवाडी येथील आपल्या शेताकडे निघाले होते. जांबोटी रस्त्यावरून आपल्या साईडने जाणाऱ्या नामदेव नाकाडी यांना रणकुंडये क्रॉस, पेट्रोल पंपनजीक समोरून बेळगावहून तोराळीकडे भरधाव जाणाऱ्या सीआरपीएफच्या ट्रकने (क्र. टीएन 37 सीजे 5827) धडक दिली. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार सीआरपीएफ ट्रक चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात घडला.
नियंत्रण सुटलेला ट्रक नाकाडी यांना धडकून रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला असलेल्या झाडाला जाऊन आदळला होता. त्याचप्रमाणे ट्रकची धडक इतकी जबरदस्त होती की दुचाकीचा चेंदामेंदा झाला आणि नाकाडी गंभीरित्या जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच वडगाव ग्रामीण पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा केला. अपघातानंतर कांही काळ या रस्त्यावरील वाहतूक विस्कळीत झाली होती.
सदर अपघातात नामदेव नाकाडे यांच्या उजव्या पायाला व डोक्याला गंभीर दुखापत होऊन मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला होता. त्यांना लागलीच बेळगावच्या एका खाजगी इस्पितळात दाखल करण्यात आले होते. तथापी उपचार सुरू असतानाच काल दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली.
त्यानंतर मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नेण्यात आला. मयत नामदेव नाकाडे यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले, सुना व नातवंडे असा परिवार आहे. नाकाडे यांचा शेती हाच व्यवसाय होता. गेल्या 15 वर्षापासून त्यांची पत्नी रुक्मिणी नाकाडी या आजारी आहेत. नामदेव यांच्या आकस्मिक मृत्यूमुळे आजारी पत्नीचा आधारवड हरपल्याने हळहळ व्यक्त होत आहे.
दरम्यान उपरोक्त अपघातानंतर बैलूर परिसरातील नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. कारण यापूर्वी देखील अनेक वेळा सीआरपीएफच्या वाहनांनी बैलूर ‘तोराळी रस्त्यावर शेतकऱ्यांची जनावरे, बैलगाड्या यांना ठोकरले आहे. यात काही जनावरे जखमी झाली आहेत. ही वाहने सुसाट वेगाने धावतात अशा वाढत्या तक्रारी असून संबंधित वाहनांच्या वेगावर नियंत्रण ठेवण्यासाठी योग्य ती कार्यवाही करण्याची मागणी शेतकरी करत आहेत.




