बेळगाव लाईव्ह : सागरे (ता. खानापूर) येथील परिश्रमी व वयोवृद्ध शेतकरी विष्णू हनमंत पाटील (वय 72) यांचा बैल उधळल्याने झालेल्या अपघातात जागीच मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना बुधवारी (10 डिसेंबर 2025) सायंकाळी घडली. त्यांच्या अकस्मात जाण्याने गावात आणि परिसरात शोककळा पसरली आहे.
दिवसभराची मळणीची कामे पूर्ण करून, भाताच्या पोत्यांसह छकडी गाडीतून पत्नीसमवेत ते घरी निघाले होते. मात्र अचानक बैल उधळल्याने ते खाली कोसळले आणि गाडीचे चाक त्यांच्या अंगावरून गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. पत्नी किरकोळ जखमी असून त्यांच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले.
अपघातानंतर ग्रामस्थांनी तात्काळ नंदगड पोलीस स्थानकाला माहिती दिली. पाटील यांच्या पत्नी लक्ष्मी पाटील यांनी फिर्याद दाखल केली असून, पोलीस पथकाने घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला आहे.
उत्तरीय तपासणीसाठी मृतदेह रवाना
मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी खानापूर प्राथमिक आरोग्य केंद्रात हलविण्यात आला आहे. गुरुवार, 11 डिसेंबर रोजी तपासणी झाल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात येणार आहे.
कुटुंबावर दुःखाचा डोंगर
विष्णू पाटील यांच्या पश्चात वयोवृद्ध पत्नी, दोन विवाहित मुली आणि नातवंडे असा मोठा परिवार आहे. कुटुंबाचा आधारस्तंभ हरवल्याने घरात शोककळा पसरली आहे. गावकऱ्यांनीही एक मेहनती शेतकरी गमावल्याची खंत व्यक्त केली.
बेळगाव अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर भरपाईचा प्रश्न ऐरणीवर
दरम्यान, बेळगावात हिवाळी अधिवेशन सुरू असून, या अधिवेशनात शेतकऱ्यांच्या समस्या मोठ्या प्रमाणात गाजत आहेत. गुरुवारी मोठा शेतकरी मोर्चा निघणार असून, खानापूर तालुक्यातील या शेतकऱ्याच्या मृत्यूचा मुद्दा अधिवेशनात उपस्थित केला जाईल का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
शेतकऱ्यांच्या आत्महत्या, शेतीतील अपघात, पीकनुकसान यांसाठी सरकारने मदत जाहीर करण्याची मागणी आधीपासूनच सुरू आहे. अशा परिस्थितीत पाटील यांच्या कुटुंबाला तातडीची आर्थिक मदत किंवा नुकसानभरपाई मिळेल का? हा प्रश्न सध्या चर्चेला आला आहे. खानापूरचे आमदार लोकप्रतिनिधी याबाबत विधिमंडळात आवाज उठवतील का मयत शेतकऱ्याला न्याय मिळवून देतील का हा देखील मुद्दा महत्त्वाचा आहे.
गावकऱ्यांचे म्हणणे आहे की, “सरकारने अशा दुर्घटनांना विशेष प्रकरण मानून कुटुंबाला न्याय द्यावा.” तर अनेक शेतकरी संघटनांनी या घटनेचा मुद्दा गुरुवारीच्या मोर्चात अधिवेशनासमोर मांडण्याची शक्यता व्यक्त केली आहे.
अंत्यसंस्कार
गुरुवारी उत्तरीय तपासणीनंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात येईल. त्यानंतर सागरे येथे अंत्यसंस्कार होतील.




