बेळगाव लाईव्ह :किणये (ता. जि. बेळगाव) येथील सरस्वती गल्ली, पहिला क्रॉस येथे नुकताच पार पडलेला नेहा दळवी व गोरख कडोलकर यांचा विवाह सोहळा केवळ कौटुंबिक आनंदाचा क्षण न ठरता समाजाला दिशा देणारा आदर्शवत उपक्रम ठरला आहे.
सध्या वाढत चाललेल्या खर्चिक, दिखाऊ आणि उशिरापर्यंत चालणाऱ्या विवाह पद्धतींना छेद देत या विवाहाने अध्यात्म, भक्ती आणि भारतीय संस्कृतीचे महत्त्व अधोरेखित केले.
डीजेचा गोंगाट, फटाक्यांची आतषबाजी किंवा अनावश्यक खर्च टाळत, या विवाह सोहळ्यात भजन-अभंगांच्या गजरात निघालेली भक्तिमय वरात समाजात सकारात्मक संदेश देणारी ठरली. महिला-पुरुष भजनी मंडळांनी एकत्र येत ‘ज्ञानोबा-माऊली-तुकाराम’च्या नामस्मरणात गावातून विवाह मंडपापर्यंत काढलेली मिरवणूक ही संस्कृती जपण्याची जिवंत उदाहरण ठरली. लहान मुलांच्या सहभागातून पुढील पिढीपर्यंत संस्कार पोहोचवण्याचा प्रयत्नही या सोहळ्यात दिसून आला.

विशेष म्हणजे विवाह विधी ठरलेल्या मुहूर्तावर वेळेत पार पडल्याने उशिरामुळे होणारा गोंधळ टळला. साधेपणा, शिस्त आणि अध्यात्म यांचा मिलाफ असलेला हा विवाह सोहळा समाजातील तरुण पिढीला दिशादर्शक ठरणारा आहे.
आधुनिकतेच्या नावाखाली वाढणाऱ्या अनावश्यक खर्चाला आवर घालत, संस्कृती जपूनही आनंदाने विवाह सोहळा पार पाडता येतो, हा महत्त्वाचा सामाजिक संदेश नेहा दळवी व गोरख कडोलकर यांच्या विवाहाने दिला आहे.




