बेळगाव लाईव्ह : सीमाभागाचा केंद्रबिंदू म्हणून ओळखल्या जाणाऱ्या येळ्ळूर गावात महाराष्ट्र एकीकरण समितीमध्ये सध्या दोन वेगवेगळे गट सक्रिय झाल्याने कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे.
या पार्श्वभूमीवर गावातील युवक कार्यकर्त्यांनी बैठक घेऊन समितीत तातडीने एकी व्हावी, अशी ठाम मागणी केली आहे.
महाराष्ट्र एकीकरण समिती येळ्ळूरमध्ये दोन गट कार्यरत असल्यामुळे युवा कार्यकर्त्यांसमोर मोठा संभ्रम निर्माण झाला असून, “आम्ही नेमके कोणत्या समितीसोबत राहायचे?” असा प्रश्न उपस्थित होत आहे. या गोंधळामुळे संघटनात्मक कामकाजावरही परिणाम होत असल्याचे युवकांनी स्पष्ट केले.
युवकांनी बैठकीत समितीच्या ज्येष्ठ नेत्यांना थेट संदेश देत सांगितले की, येळ्ळूरमधील दोन्ही समिती एकत्र आणाव्यात. अन्यथा युवकांना वेगळा पर्याय निवडावा लागेल. येत्या ग्रामपंचायत, तालुका पंचायत आणि जिल्हा पंचायत निवडणुकांमध्ये याचे परिणाम दिसून येतील, असा निर्वाणीचा इशाराही देण्यात आला आहे.
एकेकाळी सीमाभागात एकीचे आदर्श उदाहरण म्हणून येळ्ळूर गावाचे नाव घेतले जात होते. मात्र सध्या गटबाजीमुळे त्या प्रतिमेला धक्का बसत असल्याची भावना युवकांनी व्यक्त केली. समितीची ताकद, विश्वासार्हता आणि जनआधार टिकवायचा असेल तर अंतर्गत मतभेद बाजूला ठेवून एकी साधणे गरजेचे असल्याचे मत बैठकीत व्यक्त करण्यात आले.
येळ्ळूर समितीत पुन्हा एकी नांदावी, युवकांचा उत्साह आणि संघटनात्मक बळ कायम राहावे, यासाठी ज्येष्ठ नेत्यांनी पुढाकार घ्यावा, अशी अपेक्षा उपस्थित युवक कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे.




