बेळगाव लाईव्ह : उत्तर भारतातून येणाऱ्या अतिथंड वाऱ्यांमुळे संपूर्ण कर्नाटक राज्याला थंडीचा कडाका बसला असून, विशेषतः उत्तर कर्नाटकातील सात जिल्ह्यांमध्ये थंडीची तीव्र लाट पसरली आहे. बेळगावसह गुलबर्गा, बागलकोट, विजापूर आणि धारवाड या जिल्ह्यांमध्ये तापमानात सहा ते सात अंशांनी मोठी घट झाली आहे.
हवामान विभागाने या परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन सात जिल्ह्यांमध्ये ‘ऑरेंज अलर्ट’ जारी केला आहे. बेळगावचा पारा १०.२ अंशांपर्यंत खाली घसरल्याने शहरासह ग्रामीण भागातही हुडहुडी भरली आहे.
गेल्या चार दिवसांपासून बेळगाव शहर आणि परिसरात थंडीची तीव्रता इतकी वाढली आहे की, दुपारी १२ वाजेपर्यंत हवेतील गारवा कायम राहत आहे. रात्रीचे तापमान १० ते ११ अंशांपर्यंत खाली जात असल्याने ग्रामीण भागात आणि शहराच्या बाह्य भागात ठिकठिकाणी शेकोट्या पेटवल्या जात आहेत.
नोव्हेंबरअखेर सुरू झालेली थंडी मध्येच ओसरली होती, मात्र आता पुन्हा एकदा थंडीने जोरदार पुनरागमन केले आहे. यामुळे स्वेटर, मफलर आणि कानटोप्यांसारख्या ऊबदार कपड्यांच्या मागणीत प्रचंड वाढ झाली आहे.
नदीकाठच्या गावांमध्ये आणि जलाशयांच्या परिसरात सकाळी दाट धुक्याची चादर पाहायला मिळत आहे. पाण्यातून वाफा निघतानाचे नयनरम्य दृश्य ठिकठिकाणी दिसत असून निसर्गप्रेमींसाठी ही पर्वणी ठरली आहे. मात्र, या बोचऱ्या थंडीमुळे नेहमी गजबजणाऱ्या ‘मॉर्निंग वॉक’ला जाणाऱ्या नागरिकांची संख्या मोठ्या प्रमाणात घटली असल्याचे दिसून येत आहे.
थंडीची लाट आणि बदलत्या हवामानाचा थेट परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होत आहे. सध्या शहरात सर्दी, खोकला आणि तापाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढत असून खासगी व सरकारी रुग्णालयांमध्ये गर्दी वाढली आहे. वाढत्या थंडीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने नागरिकांसाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.
थंडीपासून संरक्षणासाठी नागरिकांनी बाहेर पडताना लोकरीचे कपडे परिधान करावेत आणि लहान मुले तसेच ज्येष्ठांची विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी व्हिटॅमिन सी युक्त फळांचे सेवन करावे आणि शरीराचे तापमान खालावल्यास किंवा शरीराचा थरथराट जाणवल्यास विलंब न करता डॉक्टरांशी संपर्क साधावा, असे आवाहन देखील करण्यात येत आहे.





