बेळगाव लाईव्ह : बेळगाव महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत आज शहरातील विकासकामे, स्वच्छता, भूभाडे वसुलीतील त्रुटी आणि अतिक्रमणाच्या मुद्द्यांवरून जोरदार चर्चा झाली, ज्यामुळे आजची सभा बराच वेळ सुरु राहिली. महापौर मंगेश पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सभेत नूतन आयुक्त कार्तिक एम. यांचे स्वागत करण्यात आले, तसेच त्यांना सर्वपक्षीय सहकार्याने काम करण्याचे आवाहनही करण्यात आले.
सभेतील सर्वात महत्त्वाचा आणि वादग्रस्त मुद्दा दिव्यांग व्यापाऱ्यांकडून भूभाडे वसुलीचा ठरला. महानगरपालिकेच्या अखत्यारीत व्यवसाय करणाऱ्या दिव्यांगांकडून कर न घेण्याचा नियम असतानाही खासगी कंत्राटदारांमार्फत सक्तीने वसुली केली जात होती. याची तक्रार घेऊन मारुती करेगार नावाचा एक दिव्यांग व्यापारी थेट सभेत पोहोचला.
या घटनेनंतर आमदार आसिफ सेठ यांनी मनपा अधिकाऱ्यांची चांगलीच खरडपट्टी काढली. मारुती करेगार यांच्या समस्येवर तातडीने लक्ष देऊन आसिफ सेठ यांनी अधिकाऱ्यांना सुनावले की, “दिव्यांगांकडून अशा तक्रारी अनेक वेळा आल्या आहेत. गरीब दिव्यांग दिवसाला फक्त १००-२०० रुपये कमावतात. त्यातही त्यांना कर द्यावा लागणार असेल, तर हे कसे चालेल?” अशा शब्दांत त्यांनी तीव्र संताप व्यक्त केला. अखेरीस, महसूल उपआयुक्त रेश्मा ताळीकोटे यांनी, संबंधित कंत्राटदारांना नोटीस देऊन यापुढे दिव्यांगांकडून कर न घेण्याचे निर्देश दिल्याचे स्पष्टीकरण दिले.
किल्ला तलाव, स्वच्छता आणि अतिक्रमणाचे प्रश्न देखील या बैठकीत उपस्थित करण्यात आले यावेळी नगरसेविका रेश्मा भैराकदारांनी किल्ला तलावाच्या विकासाबाबत प्रश्न उपस्थित केले. तलावाच्या नाल्यात होणारी कचराफेक थांबवण्यासाठी बेंगळुरूच्या धर्तीवर सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत. कचरा फेकणाऱ्यांना दंड ठोठावल्यास मनपाचे उत्पन्न वाढेल, अशी सूचना त्यांनी केली.
यावर अभियंता लक्ष्मी निप्पाणीकर यांनी लेझर कारंज्यातील वस्तू सुरक्षित ठेवण्यात आल्याची माहिती दिली. तसेच, किल्ला तलावाच्या विकासासाठी ८ कोटी रुपयांची निविदा मंजूर झाली असल्याचे स्पष्ट केले.
भूभाडे वसुलीचे कंत्राट अनेक वर्षांपासून एकाच व्यक्तीला दिल्याबद्दल नगरसेवक शाहिदखान पठाण यांनी आक्षेप घेतला. तर नगरसेवक अजीम पटवेगार यांनी, गरीब व्यापाऱ्यांवर कारवाई करताना, नियमांचे उल्लंघन करणाऱ्या बड्या दुकानदारांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष का, असा प्रश्न विचारला.
सभेच्या सुरुवातीला नूतन आयुक्त कार्तिक एम. यांचे स्वागत करण्यात आले. आमदार आसिफ सेठ यांनी शहराच्या स्वच्छतेसाठी १२७ कोटींची निविदा मंजूर झाली असून, याशिवाय, विशेष निधी आणि भूमिगत गटार योजनेसाठी कोट्यवधी रुपये मंजूर झाल्याची माहिती दिली.
विधान परिषद सदस्य साबण्णा तळवार यांनी शहरातील धूळ, कचरा आणि वाहतूक कोंडीवर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी करत नाराजी व्यक्त केली. सत्ताधारी पक्षाचे नेते हनुमंत कोंगाळी यांनी भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त, भाडेपट्ट्यावरील मालमत्तांचे प्रश्न आणि अनुसूचित जाती/जमाती निधीचा योग्य वापर करण्यावर भर दिला.
विरोधी पक्षाचे सदस्य अझीम पटवेगार यांनी मागील कामाचे कौतुक करून, नूतन आयुक्तांनी कर वसुली, स्वच्छता, पाणी आणि वीज योजनांना अधिक महत्त्व द्यावे, असे मत व्यक्त केले. यावेळी बोलताना नूतन आयुक्त कार्तिक एम. यांनी सर्वांना विश्वासात घेऊन बेळगावच्या विकासासाठी प्रामाणिकपणे काम करण्याची ग्वाही दिली.
या बैठकीला महापौर, उपमहापौर, नगरसेवक, विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.


