बेळगाव लाईव्ह – विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व घडणीमध्ये शिक्षकांची भूमिका निर्णायक असून, त्यांच्या हातूनच देशाचे भविष्यातील नेतृत्व तयार होत असते, असे स्पष्ट मत मराठा लष्करी प्रशिक्षण केंद्राचे ब्रिगेडियर जॉयदीप मुखर्जी यांनी व्यक्त केले.
कॅम्प येथील बी.के. मॉडेल हायस्कूलच्या शताब्दी महोत्सवाच्या समारोप कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. यावेळी व्यासपीठावर सुप्रसिद्ध कन्नड चित्रपटसृष्टीतील निर्माते-दिग्दर्शक व लेखक नागथीहळी चंद्रशेखर तसेच जिल्हा शिक्षणाधिकारी लीलावती हिरेमठ उपस्थित होते.
ब्रिगेडियर मुखर्जी पुढे म्हणाले की, आजचे विद्यार्थी उद्याचे जबाबदार नागरिक घडविण्याची जबाबदारी शिक्षकांवर आहे. शिक्षण देताना केवळ अभ्यासक्रमापुरते मर्यादित न राहता, बदलत्या काळाशी सुसंगत असे आधुनिक तंत्रज्ञान विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवणे गरजेचे आहे. जागतिक पातळीवरील युद्धपद्धतीत आमूलाग्र बदल झाले असून, ‘ऑपरेशन सिंदूर’सारख्या मोहिमांमधून आधुनिक तंत्रज्ञानाचे महत्त्व अधोरेखित झाले आहे. त्यामुळे विज्ञान आणि तंत्रज्ञान शिक्षणाला विशेष प्राधान्य देण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.
कार्यक्रमात बोलताना नागथीहळी चंद्रशेखर यांनी बेळगावशी असलेले आपले भावनिक नाते उलगडले. बेळगावात आल्यानंतर नेहमीच वेगळा आनंद मिळतो, असे सांगत त्यांनी शाळेच्या शताब्दी वर्षाबद्दल गौरवोद्गार काढले. आपण स्वतः शिक्षण घेतलेल्या सरकारी शाळेचाही यावर्षी शतक महोत्सव साजरा होत असल्याचा योगायोग त्यांनी नमूद केला. यावेळी त्यांनी आपल्या विद्यार्थी जीवनातील तसेच चित्रपटसृष्टीतील आठवणी उपस्थितांशी शेअर केल्या.

जिल्हा शिक्षणाधिकारी लीलावती हिरेमठ यांनी शिक्षण क्षेत्रातील बदल आणि शिक्षकांची सामाजिक जबाबदारी यावर प्रकाश टाकला.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला संस्थेचे अध्यक्ष अविनाश पोतदार यांनी पाहुण्यांचे स्वागत केले, तर श्रीनिवास शिवणगी यांनी आभार प्रदर्शन केले. समारोप प्रसंगी पार्श्वनाथ उपाध्ये यांच्या सादरीकरणाने कार्यक्रमाची सांगता झाली.




