बेळगाव लाईव्ह :ब्रेक फेल झालेला पाणीवाहू टँकर सुदैवाने रस्त्यावरून जाणाऱ्या लोकांना टाळून ब्रिजच्या भिंतीला जाऊन आदळल्यामुळे मोठी जीवित हानी टळल्याची घटना आज दुपारी हालगा ब्रिज येथे घडली.
याबाबतची थोडक्यात माहिती अशी की, राष्ट्रीय महामार्गाच्या कामासाठी वापरला जाणारा सदर अपघातग्रस्त पाण्याचा टँकर आज मंगळवारी दुपारी दुरुस्तीसाठी गॅरेजकडे नेण्यात येत होता.
टँकर बिघडला असल्यामुळे मालकाने चालक प्रेमचंद माथुर याला तो सावकाश गॅरेजकडे घेऊन जाण्यास सांगितले होते. त्यानुसार टँकर घेऊन जात असताना हालगा ब्रिजजवळ त्याचे ब्रेक अचानक निकामी झाले.
त्याचवेळी सुवर्णसौध येथील आंदोलनासाठी जाणारे लोक रस्त्यावरून जात होते. तथापि ब्रेक फेल होऊन नियंत्रण सुटलेला पाण्याचा टँकर सुदैवाने त्यांच्या अंगावर न जाता हालगा ब्रिजच्या भिंतीला जाऊन आदळल्यामुळे मोठी दुर्घटना टळली.




