बेळगाव लाईव्ह : टिळकवाडी, बेळगाव येथील काँग्रेस रोड रस्त्यावर भरधाव मोटरसायकल चालवत धोकादायक ‘व्हीली’ केल्याप्रकरणी रहदारी दक्षिण पोलिसांनी एका युवकाला ताब्यात घेतले आहे.
पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या युवकाचे नाव कार्तिक संजू मास्तमर्डी (वय 24 रा. अन्नार गल्ली, पिरनवाडी बेळगाव) असे आहे. याबाबतची माहिती अशी की, बेळगाव दक्षिण रहदारी पोलिसांच्या व्याप्तीतील काँग्रेस रोड टिळकवाडी या रस्त्यावर करण्यात आलेल्या बाईक अर्थात मोटरसायकल व्हिलिंगचा व्हिडिओ गेल्या 30 नोव्हेंबर रोजी कोणीतरी सोशल मीडियावर व्हायरल केला होता.
सदर व्हिडिओ पाहून संबंधित दुचाकी वाहन आणि वाहन चालकाला शोधण्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशावरून रहदारी दक्षिण पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक ए. एस. मादर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी तपास कार्य हाती घेतले.
तसेच अल्पावधीत अन्नार गल्ली, पिरनवाडी कार्तिक मास्तमर्डी याचा घरचा पत्ता शोधून काढून त्याची चौकशी केली केली. त्यावेळी त्याने आपला मित्र शोएब मोहम्मदगौस किल्लेदार याच्या समवेत टिळकवाडी दुसऱ्या रेल्वे गेट जवळ काँग्रेस काँग्रेस रोडवर मोटरसायकलचे (क्र. केए 22 एचटी 9635) पुढील चाक उंचावून धोकादायक व्हीली केल्याचे कबूल केले.
त्यामुळे पोलिसांनी त्याला मोटरसायकलीसह ताब्यात घेतले असून याप्रकरणी रहदारी दक्षिण विभाग पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.


