बेळगाव लाईव्ह : बेळगावमध्ये कर्नाटक प्रशासनाकडून महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेत्यांवर, शिवसैनिक आणि मराठी कार्यकर्त्यांवर झालेल्या दडपशाहीच्या घटनेनंतर, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष) युवासैनिकांनी पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची भेट घेऊन त्यांना निवेदन सादर केले आहे.
आज बेळगावच्या युवासैनिकांनी मुंबईत उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी कर्नाटक प्रशासनाने ८ डिसेंबर २०२५ रोजी केलेल्या दडपशाही आणि अटकेच्या कारवाईचा तीव्र निषेध केला. कर्नाटक सरकारच्या या लोकशाहीविरोधी वर्तनाचा सीमाभागातील मराठी माणूस धिक्कार करत असल्याचे मत त्यांनी पक्षप्रमुखांसमोर मांडले.
“गेल्या अनेक दशकांपासून बेळगाव आणि सीमाभागातील मराठी बांधव भाषेच्या आधारावर महाराष्ट्रात सामील होण्याची न्याय्य व संविधानिक मागणी करत आहेत,” असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. सीमाप्रश्न सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असतानाही बेळगावचे ‘बेळगावी’ असे नामांतर करणे, तसेच विधानसौध बांधून तिथे अधिवेशन भरवून मराठी भाषिकांच्या भावना मुद्दामहून दुखावणारे कृत्य कर्नाटक सरकार दरवर्षी करते, असा आरोप युवासैनिकांनी केला आहे.
या अधिवेशनाला प्रत्युत्तर म्हणून आयोजित करण्यात आलेल्या महामेळाव्यासारख्या शांततापूर्ण आणि लोकशाही मार्गाने चाललेल्या कार्यक्रमाला परवानगी नाकारणे, तसेच उपस्थित कार्यकर्त्यांना बळाचा वापर करून अटक करणे, हे अत्यंत संतापजनक आहे. कर्नाटक प्रशासनाच्या या अत्याचारी आणि मराठीविरोधी कृत्याचा आम्ही जाहीर निषेध करत असल्याचे युवासैनिकांनी उद्धव ठाकरे यांना सांगितले.

“सीमाभागातील मराठी बांधवांच्या न्याय्य मागणीला पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरेंसोबतच, आपलेही वेळोवेळी खंबीर पाठिंबा मिळाला आहे,” असे युवासैनिकांनी नम्रपणे नमूद केले. त्याच अनुषंगाने, “सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या लढाईत आणि रस्त्यावरच्या संघर्षात शिवसेना मराठी भाषिकांच्या पाठीशी यापुढेही अशीच खंबीरपणे उभी राहील,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
या शिष्टमंडळात युवासैनिक विनायक हूलजी, सोमनाथ सावंत, वैभव कामत, मल्हारी पावसे, अद्वैत माने, जय पावशे, सक्षम कंग्राळकर, विनायक पाटील यांचा समावेश होता.





