बेळगाव लाईव्ह : सीमाभागावर आपला हक्क सांगण्यासाठी कर्नाटक सरकार दरवर्षी बेळगावात भरवत असलेल्या हिवाळी अधिवेशनांवर आत्तापर्यंत 169.6 कोटी रुपये खर्च करण्यात आले असून यंदा 8 डिसेंबरपासून दहा दिवस चालणाऱ्या या हिवाळी अधिवेशनावर तब्बल 21 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.
अधिवेशन काळात सर्वाधिक खर्च मंत्रिमंडळासह अधिकारीवर्ग आणि कर्मचाऱ्यांच्या निवासावर होत आहे. याखेरीज सुरक्षा व्यवस्था, मंत्री, आमदार, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची जेवणावळी, मार्शल, पोलीस बंदोबस्त, परिवहन सेवा, इंटरनेट सुविधा, दूरध्वनी खर्च, वाहनांना इंधन यासह अन्य सुविधांवर बराच पैसा खर्च केला जातो.
हा खर्च कमी करण्याच्या दृष्टीने सुवर्णसौध परिसरात आमदार भवन बांधण्यात यावे, अशी मागणी दशकभरापासूनची असली तरी त्याकडे दुर्लक्ष झाले आहे. राज्य सरकारने बेळगाव सुवर्ण विधानसौध येथे झालेल्या मागील हिवाळी अधिवेशनांवर 169.6 कोटी रुपये खर्च केले आहेत.
जिल्हा प्रशासनाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, यावर्षी सुवर्णसौध येथे 8 ते 19 डिसेंबर दरम्यान होणाऱ्या 10 दिवसांच्या हिवाळी अधिवेशनासाठी 21 कोटी खर्च खर्च अपेक्षित आहे, तर गेल्या वर्षी 15.30 कोटी रुपये खर्च झाले होते. या पद्धतीने अधिवेशन आयोजनाच्या खर्चात यावर्षी 5 कोटींहून अधिक रुपयांची भर पडली आहे.




