बेळगाव लाईव्ह :थंडीचा कडाका वाढला असताना बेळगावमध्ये 8 डिसेंबरपासून प्रारंभ होणाऱ्या कर्नाटक विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनासाठी येथील सुवर्ण विधानसौध सज्ज होत आहे.
हिवाळी अधिवेशन सुरू होण्यास अवघे 6 दिवस शिल्लक असल्यामुळे त्याची पूर्वतयारी अंतिम टप्प्यात आली असून 60 पुरुष आणि 70 महिला असे एकूण 130 कामगार आपल्या कामात निरंतर व्यस्त असल्याचे पहावयास मिळत आहे.
बेळगाव सुवर्ण विधानसभा नुकतीच भेट दिलेल्या विधानसभा अध्यक्ष यु. टी. खादर आणि विधान परिषद सभापती बसवराज होरट्टी यांनी अधिवेशन यशस्वी होण्यासाठी हाती घ्यावयाच्या आवश्यक त्या सिद्धतांबाबत निर्देश दिले आहेत.
या वर्षीच्या अधिवेशनाच्या तयारीत कोणत्याही उणीवा राहणार नाहीत या दृष्टीने अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आपले कर्तव्य पार पाडावे, अशी सूचना त्यांनी केली आहे. त्यांच्या निर्देशानुसार अधिकारी व कर्मचारीवर्ग कामाला लागला आहे.
सुवर्ण विधानसौध येथे गेल्या 20 दिवसांपासून अधिवेशनाची तयारी सुरू झाली आहे. विधानसभा व विधानपरिषद सभागृह मुख्यमंत्र्यांसह मंत्र्यांच्या आणि अधिकाऱ्यांच्या कक्षांची अर्थात खोल्यांची स्वच्छता केली जात आहे. विधानसभा इमारतीमध्ये विविध खात्यांच्या कार्यालयांचे स्थलांतर केले जात आहे. अधिवेशन सुरळीत पार पडावे या दृष्टीने आवश्यक ती सिद्धता केली जात आहे.
सर्व कक्षांची स्वच्छता केली जात असून सुवर्णसौध आवारातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या भोजन व्यवस्थेसाठी मंडप उभारला जाणार आहे. सौध आवारात असलेल्या हेलिपॅडची देखील स्वच्छता करून ते सुसज्ज केले जात आहे, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम खात्याचे सहाय्यक कार्यकारी अभियंता बसवराज हलगी यांनी दिली.
अधिवेशन कालावधीत होणाऱ्या निदर्शनासाठी सुवर्णसौध उद्यान, सुवर्ण गुड्ड आणि कोंडसकोप्प बायपास रस्ता या ठिकाणी तंबू उभारण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. दरम्यान जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन आज मंगळवारी सकाळी सुवर्ण विधानसौधला भेट देऊन अंतिम टप्प्यात असलेल्या अधिवेशनाच्या पूर्वतयारीची प्रत्यक्ष पाहणी करणार आहेत.




