बेळगाव लाईव्ह :दोन दिवसांपूर्वी हट्टीहोळ गल्ली, शहापूर येथे रस्त्याशेजारी पार्क केलेली चार दुचाकी वाहने अज्ञातांनी पेटवून देण्याचा प्रकार घडला होता. याप्रकरणी शहापूर पोलिसांनी दोघा जणांना अटक केली आहे.
पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींची नावे ऋषिकेश प्रभाकर केरवाडकर (वय 28, रा कोरे गल्ली, शहापूर बेळगाव) आणि विशाल गजानन चौगुले (वय 25, रा. कोरेगल्ली सध्या आनंदनगर तिसरा क्रॉस वडगाव बेळगाव) अशी आहेत.
याबाबतची थोडक्यात माहिती अशी की गेल्या शनिवारी रात्री 11 ते रविवारी पहाटे 4:30 वाजण्याच्या कालावधीत हट्टीहोळ गल्ली, शहापूर येथील शुभम श्रीकांत कडोलकर (मूळ रा. कोरे गल्ली शहापूर) यांच्या घरासमोर रस्त्याशेजारी पार्क केलेल्या दुचाकी वाहनांसह मंडपाचे बांबू अज्ञात समाजकंटकांनी पेटवून दिले होते.
पेटवलेल्या वाहनांमध्ये 1,30,000 रुपये किमतीची हिरो स्प्लेंडर प्लस मोटर सायकल (क्र. केए 22 एचक्यू 7501), टीव्हीएस कंपनीची स्कुटी (क्र. 22 एचव्ही 6091), होंडा एक्टिवा (क्र. केए 22 एचडी 9530) आणि होंडा एक्टिवा (क्र. एमएच 09 बीएन 5257) या चार दुचाकी वाहनांचा समावेश होता.
या व्यतिरिक्त समाजकंटकांनी मंडपासाठी वापरले जाणारे 150 बांबू देखील पेटवून दिले होते. याप्रकरणी शहापूर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंद होताच पोलीस निरीक्षक एस. एस. सिवानी यांच्या नेतृत्वाखाली तपास कार्य हाती घेण्यात आले होते. पोलीस तपासाअंती ऋषिकेश आणि विशाल यांना अटक करण्यात आली. याप्रकरणी अधिक तपास सुरू आहे.




