बेळगाव लाईव्ह :बेळगाव जिल्हा पोलीस दलातील ‘अदिती’ या श्वानाने बेंगलोर येथे नुकत्याच पार पडलेल्या कर्नाटक राज्यस्तरीय पोलीस कर्तव्य स्पर्धा 2025 मध्ये अभिमानास्पद कामगिरी केली आहे.
पोलीस श्वानांच्या अंमली पदार्थ शोध स्पर्धेत अदितीने प्रथम क्रमांकसह सुवर्ण पदक पटकावल्यामुळे तिची राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
बेळगाव पोलीस दलातील अदिती या श्वानाला अंमली पदार्थ शोधण्यासाठी प्रशिक्षित करण्यात आले आहे. राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड होण्याच्या अदितीच्या यशाचे संपूर्ण श्रेय तिचे प्रशिक्षक महेश घटनट्टी आणि यल्लेश नायक यांनी दिलेले प्रशिक्षण, केलेली देखभाल आणि त्यासाठी घेतलेले परिश्रम याला जाते.
त्यांच्या या परिश्रमामुळेच अदिती श्वानाने राज्यस्तरीय स्पर्धेत बाजी मारून राष्ट्रीय स्पर्धा गाठली आहे. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल अदिती व तिच्या प्रशिक्षकांचे पोलीस दलासह सर्वत्र अभिनंदन होत आहे.



