बेळगाव लाईव्ह :राज्यातील ऊस, भात, मका वगैरे पिकं घेणाऱ्या शेतकऱ्यांच्या समस्या हाताळण्यात अपयशी ठरलेल्या मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकारच्या निषेधार्थ उद्या मंगळवार दि. 9 डिसेंबर रोजी बेळगाव सुवर्ण विधानसौधला घेराव घालून भव्य आंदोलन छेडण्यात येणार असल्याची माहिती भारतीय जनता पक्षाचे राज्य अध्यक्ष विजयेंद्र यांनी दिली.
राज्य सरकारच्या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर बेळगाव येथे उद्या मंगळवारी भारतीय जनता पक्षाचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्याच्या पूर्वतयारीचा आढावा घेण्यासाठी बेळगाव येथे आले असता ते प्रसिद्धी माध्यमांशी बोलत होते. विजयेंद्र यांनी सांगितले की, राज्यातील ऊस, भात वगैरे विविध पीकं घेणाऱ्या शेतकऱ्यांच्या समस्या हाताळण्यात मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या नेतृत्वाखालील सरकार अपयशी ठरले आहे. त्याचप्रमाणे अलीकडे आलेल्या पुराच्या संकटाप्रसंगी महसूल मंत्र्यांनी शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र त्या आश्वासनाची पूर्तता देखील करण्यात आली नसून शेतकऱ्यांना अद्यापपर्यंत नुकसान भरपाई अदा करण्यात आलेली नाही.
या संदर्भात वेळोवेळी आम्ही जाब विचारला असता प्रत्येक वेळी राज्य सरकार केंद्र सरकारला दोषी ठरवत असते. तेंव्हा राज्य सरकारने तात्काळ शेतकऱ्यांना मदत करावी यासाठी यासाठी उद्या आम्ही भव्य आंदोलन छेडत आहोत. या आंदोलनात बेळगावसह आसपासच्या जिल्ह्यातील हजारो शेतकरी सहभागी होणार आहेत. ज्यामध्ये बेळगाव, बागलकोट, विजापूर वगैरे सर्व जिल्ह्यातील भाजप आमदार, खासदार, विधान परिषद सदस्यांसह कार्यकर्त्यांचाही सहभाग असणार आहे.
शेतकऱ्यांच्या समस्यांकडे सरकार बघून न बघितल्यासारखे, ऐकून न ऐकल्यासारखे करत असल्यामुळे सुवर्ण विधानसौधला घेराव घालून हे आंदोलन छेडले जाणार आहे. राज्य सरकार शेतकऱ्यांच्या समस्यांच्या बाबतीत केंद्र सरकारला दोषी ठरवत आहे. मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्याऐवजी त्यासंदर्भात पंतप्रधानांना पत्र लिहितात. थोडक्यात राज्य सरकार आपली जबाबदारी पार पाडण्यात अपयशी ठरत असून प्रत्येक बाबतीत केंद्र सरकारला दोष देण्यात धन्यता मानत आहे. आपली जबाबदारी झटकत आहे.
बेळगाव सुवर्ण विधानसौध येथे सुरू असलेल्या सरकारच्या हिवाळी अधिवेशनाकडे शेतकरी बांधव आपल्याला चांगली मदत, नुकसान भरपाई मिळेल या आशेने पाहत असून ती नुकसान भरपाई मिळावी अशी भारतीय जनता पक्षाची मागणी आहे, असे भाजप राज्याध्यक्ष विजयेंद्र यांनी सांगितले. त्याप्रसंगी आमदार सी. टी. रवी, आमदार अभय पाटील, आमदार विठ्ठल हलगेकर, माजी आमदार अरविंद पाटील वगैरे भाजपची नेतेमंडळी उपस्थित होती.


