बेळगाव लाईव्ह : बेळगाव शहराने 2018 मध्ये आणि त्यानंतर पुन्हा एकदा 2022 मध्ये ‘सेव्ह आयएक्सजी’ अर्थात बेळगाव विमानतळाला वाचवा असा आवाज उठवला होता. याच शहराला आता 2025-26 मध्ये आणखी एका भीषण परिस्थितीला सामोरे जावे लागत आहे. शहराचा हवाई संपर्क (कनेक्टिव्हिटी) पुन्हा एकदा ढासळला असून ज्यामुळे प्रवाशांना आयएक्सजी वरून सहज पोहोचता येणाऱ्या ठिकाणी जाण्यासाठी इतर शहरांकडे वळावे लागत आहे.
एकेकाळी एक भरभराटीचे व्यवसाय, शिक्षण, आरोग्यसेवा प्रवास आणि कौटुंबिक संपर्काची जीवनरेखा असलेले प्रादेशिक केंद्र असणारे बेळगावचे विमानतळ नागरिकांनी अथक आवाज उठवूही कमकुवत झाले आहे. ताजा धक्का : 25 डिसेंबर 2025 पासून मुंबईशी थेट कनेक्टिव्हिटीचा अभाव शहराला एका कठोर वास्तवाला सामोरे जाण्यासाठी जागे करणारा ठरला : स्टार एअरने आपली बेळगाव-मुंबई थेट विमानसेवा स्थगित केली असून त्याऐवजी नांदेडला सेवा सुरू केली आहे.
ही एकमेव नॉन-स्टॉप सेवा होती जी आयएक्सजीला भारताच्या आर्थिक राजधानीशी जोडत होती. तसेच व्यावसायिक प्रवासी, कौटुंबिक भेटी आणि पुढील आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी अत्यंत महत्त्वाची होती. स्टार एअरने 25 डिसेंबरपासून बेळगाव-मुंबई विमानसेवा बंद केल्यामुळे बेळगाव शहराकडे आता दिल्ली, जयपूर, हैदराबाद, अहमदाबाद आणि बंगलोर अशा फक्त 5 थेट विमानसेवा उरल्या आहेत. बेळगाव सारख्या शहराच्या आकारमानासाठी आर्थिक घडामोडी आणि सामरिक महत्त्वासाठी ही केवळ विमानसेवेतील कपात नाही तर हा एक गतिशीलता, व्यावसायिक आत्मविश्वास आणि सार्वजनिक सोयीसाठी थेट धक्का आहे. मुंबई जे सर्वात आर्थिकदृष्ट्या महत्त्वाचे ठिकाण आहे ते आता बेळगावहून थेट जोडलेले नाही.
भारताची आर्थिक आणि व्यावसायिक राजधानी असलेल्या मुंबईला जाणाऱ्या किंवा आंतरराष्ट्रीय कनेक्टिंग फ्लाइट्स पकडणाऱ्या प्रवाशांना आता आधी गोवा किंवा हुबळीला प्रवास करून पुढे जाण्यास भाग पडत आहे. ही केवळ गैरसोय नाही, तर ही एक प्रतिगामी परिस्थिती आहे.
नागरी प्रयत्न, मोहिमा आणि प्रतिनिधित्वाच्या अपयशानंतर 2018 मध्ये बेळगावने ‘आयएक्सजी वाचवा’ मोहिमेचे अभिमानाने नेतृत्व केले होते. ही एक अशी मोहीम होती जिने विमानसेवेतील संपर्क तुटू नये यासाठी नागरिक, व्यापारी संघटना आणि प्रवाशांना एकत्र आणले. शहराने 2022 मध्ये पुन्हा तेच केल्यामुळे असे वाटले की प्रतिनिधित्व आणि दबावामुळे स्थिर विमानमार्ग सुरक्षित करता येतील. तथापी प्रयत्नानंतरही आता 2025-26 मध्ये आपण पुन्हा त्याच लढाईला सामोरे जात आहोत.
आमचे निवडून आलेले प्रतिनिधी कुठे आहेत? त्यांचा कुठेही पत्ता नाही. जेंव्हा जेंव्हा कनेक्टिव्हिटीची समस्या निर्माण होते, तेंव्हा नागरिक, व्यावसायिक आणि नागरी समाज आवाज उठवेपर्यंत हे प्रतिनिधी, पदधिकारी शांत राहतात. विशेषतः बेळगावचे प्रतिनिधित्व करणाऱ्या अधिकाऱ्यांनी चालवलेल्या संस्थात्मक पाठपुराव्याच्या तुलनेत ही एक मर्यादित आवाका आणि परिणाम असलेली रणनीती आहे. ही कांही किरकोळ गैरसोय नसून मर्यादित हवाई कनेक्टिव्हिटीमुळे पर्यटनाला बाधा येते, आर्थिक स्पर्धात्मकता कमकुवत होते, औद्योगिक वाढ मंदावते आणि लोकांना जास्त प्रवास खर्च व लॉजिस्टिकचा भार सहन करावा लागतो.


दुर्लक्षाचा वारसा – पण मौनाचा नाही : दशकांपासून बेळगावने पायाभूत सुविधांच्या प्राधान्यांमध्ये असमतोल आणि दुर्लक्ष सहन केले आहे. तुलनात्मक शहरांच्या तुलनेत रस्ते, सार्वजनिक सेवा आणि अगदी हवाई संपर्कच्या बाबतीतही बेळगाव मागे पडले आहे. तरी देखील या शहराने कधीही हार मानली नाही. ते वेळोवेळी एकटेच लढले, प्रशासकीय निष्क्रियता आणि उदासीन शासनाविरुद्ध संघर्ष करत राहिले. नागरिकांनी आवाज उठवला. व्यवसायांनी जाहिरातींसाठी निधी दिला. मोहिमा चर्चेत आल्या. तथापी सातत्यपूर्ण राजकीय पाठिंबा आणि संरचनात्मक धोरणात्मक समर्थनाअभावी सर्व प्रयत्न कायमस्वरूपी उपायांऐवजी केवळ तात्पुरत्या मलमपट्ट्या ठरले आहेत.
आता शहराचे आकाशाकडे जाणारे प्रमुख प्रवेशद्वार पुन्हा एकदा धोक्यात आल्यामुळे बेळगावला एका कठोर सत्याचा सामना करावा लागणार आहे. जोपर्यंत येथील प्रतिनिधी कनेक्टिव्हिटी अर्थात हवाई संपर्काला एक शाश्वत प्राधान्य देत नाहीत, केवळ अधूनमधून केली जाणारी प्रसिद्धीची कसरत नाहीत तोपर्यंत कनेक्टिव्हिटीसाठीचा संघर्ष संपणार नाही. आयएक्सजी वाचवा : एक मोहीम जी हार सहजासहजी हार मानणारी नाही. बेळगावला आपल्या आकाशासाठी लढा देण्याची ही पहिलीच वेळ नाही. 2018 मध्ये जेंव्हा स्पाइसजेटने बेळगावहून आपली सेवा अचानक बंद करून ती हुबळीकडे वळवली, तेंव्हा लोकांचा संताप रस्त्यावर आणि सोशल मीडियावर उसळला.
त्या संतापाचे कृतीत रूपांतर झाले आणि राजकीय वर्तुळातून नव्हे, तर नागरिक, संघटना आणि व्यवसायांमधून ‘आयएक्सजी वाचवा’ (सेव्ह आयएक्सजी) मोहीम जन्माला आली. ही चळवळीने वेग घेत राजकीय वर्गापर्यंत पोहोचली आणि अखेरीस बेळगावसाठी नवीन मार्ग, नवीन विमान कंपन्या आणि ‘उडान’ कनेक्टिव्हिटीला कारणीभूत ठरली.
त्यानंतर 2022 मध्ये विमानसेवेतील अस्थिरता परत आल्याने ही मोहीम पुन्हा सुरू झाली. आता 2026 साल जवळ येत असताना पुन्हा एकदा चिंताजनक परिस्थितीची चिन्हे दिसू लागली आहेत. अधूनमधून चालवल्या जाणाऱ्या मोहिमांपेक्षा बेळगावला अधिक काहीतरी मिळायला हवे.
बेळगाव शहराला पुढील गोष्टींची गरज आहे : संसदेत आणि राज्य विधीमंडळात समर्पित प्रतिनिधित्व, जे आयएक्सजी कनेक्टिव्हिटीसाठी सातत्याने प्रयत्न करेल. उडान किंवा तत्सम दीर्घकालीन विमान वाहतूक धोरणात्मक आराखड्यांमध्ये धोरणात्मक समावेश. स्थिर विमानसेवा मिळवण्यासाठी सार्वजनिक-खाजगी भागीदारी. पारदर्शक प्रगतीचा मागोवा, ज्याद्वारे रहिवासी अधिकाऱ्यांना जबाबदार धरू शकतील. ‘सेव्ह आयएक्सजी’ चळवळीला पुन्हा एकदा उभे राहावे लागेल. कारण लोकांना आंदोलन करायला आवडते म्हणून नाही, तर इतिहासाने दाखवून दिले आहे की हीच एकमेव भाषा आहे जी प्रभावी ठरते. जर सामान्य नागरिकांनी विमानप्रवास करावा, व्यवसायांची वाढ व्हावी, बेळगावने स्पर्धा करावी अशी अपेक्षा असेल तर आयएक्सजीला पुरेशी स्थिर आणि अर्थपूर्ण हवाई कनेक्टिव्हिटी मिळणे आवश्यक आहे.





