बेळगाव लाईव्ह :पोलिसांचा वचक कमी झाल्यामुळे बेळगाव शहर परिसरात चोरट्यांचा उच्छाद वाढला असून चोरट्याच्या एका त्रिकूटाने 1 लाखाहून अधिक रक्कम असलेली चक्क एक एटीएम मशीनच लंपास करून ती फोडताना न आल्यामुळे राष्ट्रीय महामार्ग शेजारी दरीत फेकून दिल्याची खळबळजनक घटना आज सकाळी न्यू वंटमुरीनजीक उघडकीस आली.
याबाबतची थोडक्यात माहिती अशी की, बेळगाव तालुक्यातील न्यू वंटमुरी गावामध्ये एका ठिकाणी इंडिया वन एटीएम मशीन होते. तिघा चोरट्यांनी काल सोमवारी रात्री सदर सुमारे 1 लाखाहून अधिक रक्कम असलेले एटीएम मशीन चक्क उखडून काढून गाडीत घालून लंपास केले. त्यानंतर ते मशीन न्यू वंटमुरीपासून कांही अंतरावर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 48 वर नेऊन गॅस कटरद्वारे तोडण्याचा प्रयत्न चोरट्यांनी केला.
तथापि अथक प्रयत्न करूनही एटीएम मशीन फोडताना आल्यामुळे त्यांनी ते रस्त्याशेजारील दरीत फेकून दिले. गावातील इंडिया वन एटीएम मशीन जागेवर नसल्याचे आणि त्या ठिकाणी मशीनचे कांही अवशेष संशयास्पदरित्या पडल्याचे आढळून आल्यामुळे चोरीचा हा प्रकार उघडकीस आला.
याबाबतची माहिती मिळताच काकती पोलिसांनी ताबडतोब घटनास्थळी दाखल होऊन पाहणी करण्याद्वारे तपास कार्य हाती घेतले.
तपासअंती गावातून गायब झालेले एटीएम मशीन राष्ट्रीय महामार्गाशेजारील दरीत झाडाझुडपांमध्ये पडलेले आढळून आले. दरीत पडलेले मशीन अवजड असल्यामुळे क्रेनच्या सहाय्याने बाहेर आले. एटीएम मशीन चोरीची ही घटना न्यू वंटमुरी गावासह परिसरात चर्चेचा विषय झाली आहे. याप्रकरणी काकती पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला असून पोलीस चोरट्यांचा शोध घेत आहेत.

