बेळगाव लाईव्ह :गेल्या सप्टेंबर महिन्यात अविश्वासाचा ठराव आणण्यात आलेले बेळगाव बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. एस. एस. किवडसन्नावर यांच्यावरील अविश्वास ठराव कर्नाटक उच्च न्यायालयाने रद्दबातल ठरविला आहे. न्यायालयाच्या या निर्णयामुळे आता ॲड. किवडसन्नावर हेच बेळगाव बार असोसिएशनच्या अध्यक्षपदी कायम असणार आहेत.
बेळगाव बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. एस. एस. किवडसन्नावर यांच्यावर गेल्या 20 सप्टेंबर 2025 रोजी अविश्वास ठराव आणण्यात आल्यानंतर त्याच्या विरोधात त्यांनी उच्च न्यायालयाच्या धारवाड खंडपीठात धाव घेऊन दाद मागितली होती. न्यायालयात ॲड. किवडसन्नावर यांच्या वतीने ॲड. विजयकुमार शीलवंत यांनी, तर बेळगाव बार असोसिएशनतर्फे ॲड. नयना निर्ली यांनी युक्तिवाद केला. वादी -प्रतिवादी वकिलांचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर न्यायालयाने ॲड. एस. एस. किवडसन्नावर यांच्यावरील अविश्वास ठराव रद्दबादल ठरविला आहे. त्यामुळे ॲड. किवडसन्नावर हेच यापुढे बेळगाव बार असोसिएशनच्या अध्यक्षपदी कायम असणार आहेत.
या प्रकरणाची पार्श्वभूमी अशी की, कांही वकिलांनी बेळगाव न्यायालयात दोन-तीन बोगस वकील प्रॅक्टिस करत असून त्यांच्यावर कारवाई करावी, अशी तक्रार 26 नोव्हेंबर 2024 रोजी बेळगाव बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. किवडसन्नावर त्यांच्याकडे आली होती. मात्र त्यांनी याकडे दुर्लक्ष करून त्यावर कोणतीही कारवाई केली नव्हती. या मुद्द्यावर वकिलांची साथ न दिल्याने किवडसन्नावर हे अध्यक्षपदांवर नको यासाठी अविश्वास दाखल करा अशी 455 वकिलानी ॲड. सानिकोप्प यांच्या नेतृत्वाखाली स्वाक्षऱ्या करत बार असोसिएशनकडे मागणी केली होती. मात्र अद्याप सर्वसाधारण बैठक घेतली गेली नसल्यामुळे ॲड. सानिकोप्प यांनी न्यायालयात याचिका दाखल करून अध्यक्षांवर अविश्वास ठराव मांडण्याची मागणी केली होती.
त्यावेळी उच्च न्यायालयाने तातडीने विषय सर्वसाधारण सभा घेण्याचा आदेश बेळगाव बार असोसिएशनला बजावला होता. त्यानुसार अविश्वास ठरावावर मतदान घेण्यात आले. तेंव्हा एकूण 629 वकील मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. त्यापैकी 428 जणांनी ॲड. एस. एस. किवडसन्नावर यांच्या विरोधात, तर 194 जणांनी त्यांच्या बाजूने मतदान केले. उर्वरित 7 मते अवैध ठरली होती. या पद्धतीने निम्म्याहून अधिक जणांनी विरोधात मतदान केल्यामुळे अध्यक्ष ॲड. किवडसन्नावर यांच्यावरील अविश्वास ठराव पारित करून प्रभारी अध्यक्ष म्हणून उपाध्यक्ष ॲड. बसवराज मुगळी यांची निवड करण्यात आली होती.
मात्र आता उच्च न्यायालयाने ॲड. एस. एस. किवडसन्नावर यांच्यावरील अविश्वासाचा ठराव रद्दबातल केला आहे. न्यायालयाच्या आदेशानंतर ॲड. किवडसन्नावर यांच्या समर्थकांनी काल न्यायालय आवारात फटाक्यांची आतषबाजी करून आनंद व्यक्त केला. त्यानंतर आज मंगळवारी सकाळी बेळगाव न्यायालयात ॲड. एस. एस. किवडसन्नावर यांच्यावर त्यांच्या समर्थकांनी अभिनंदनचा वर्षाव केला.
आदेशानंतर ॲड. एस. एस. किवडसन्नावर यांनी आज मंगळवारी पुढील प्रमाणे आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. संपूर्ण समाजाच्या कल्याणाची काळजी असलेल्या प्रत्येकाला वकील समुदायाची ताकद दाखवण्याची वेळ पुन्हा एकदा आली आहे. माननीय न्यायमूर्ती नागप्रसन्ना यांनी 15-12-2025 रोजी दिलेल्या त्यांच्या ऐतिहासिक निर्णयात, याचिका क्र. 107690/2025 मध्ये प्रभारी अध्यक्षांच्या नेतृत्वाखालील बार असोसिएशन समितीने केलेल्या सर्व पुढील कृती रद्दबातल ठरवल्या आहेत. पुढे, ही महत्त्वपूर्ण याचिका मंजूर करण्यात आली असून 20-09-2025 रोजी विशेष सर्वसाधारण सभेत मंजूर केलेला ठराव याद्वारे रद्द करण्यात येत आहे. अशा प्रकारे, माझ्या विरोधकांनी उपस्थित केलेले सर्व आक्षेप बाजूला सारून न्यायालयाने मला माझ्या वकील बंधू आणि भगिनींची पुन्हा एकदा सेवा करण्याची आणखी एक संधी दिली आहे.
आता गेल्या कांही दिवसांत जे काही घडले, ते मी निश्चितपणे एक वाईट स्वप्न म्हणून विसरून जाईन. कारण मी बारच्या माझ्या सर्व आदरणीय वरिष्ठ सदस्यांना आणि माझ्या सर्व सन्माननीय सहकारी बंधूंना विश्वासात घेण्यासाठी बध्द आहे आणि जर मला संधी मिळाली तर बेळगाव बार असोसिएशनचा 150 वा वर्धापन दिन साजरा करण्यासाठी प्रयत्न करेन, असे सांगून शेवटी मी माझ्या त्या सर्व सहकारी बंधूंचे आभार मानल्याशिवाय राहू शकत नाही, ज्यांनी या भव्य यशात सुंदर भूमिका बजावली. विशेषतः वरिष्ठ वकील ॲड. व्ही. एम. शिलवंत, उच्च न्यायालय धारवाडचे ॲड. निलोपंत आणि माझे सहकारी वकील ॲड. धनराज गवळी, ॲड. विजय होनमणी, ॲड. प्रशांत वडियार, ॲड. सुभाष पट्टणशेट्टी आणि माझ्या बारमधील इतर अनेक जणांचा, त्यांच्या मोठ्या पाठिंब्याबद्दल आणि काळजीबद्दल मी त्यांचे मनःपूर्वक आभार मानतो, असे बेळगाव बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. एस. एस. किवडसन्नावर यांनी म्हंटले आहे.


