belgaum

बी. के. मॉडेल शाळेचा शताब्दी महोत्सव : स्त्री सर्वार्थाने श्रेष्ठच : अभिनेते सचिन पिळगावकर

0
629
 belgaum

बेळगाव लाईव्ह : झगमगत्या चित्रपटसृष्टीमागे दडलेला संघर्ष, शिक्षणाचं अपूर्ण राहिलेलं स्वप्न आणि आयुष्यभर शिकत राहण्याची जिद्द — या साऱ्यांचा प्रेरणादायी लेखाजोखा जेष्ठ अभिनेते सचिन पिळगावकर यांनी बी.के. मॉडेल हायस्कूलच्या शताब्दी महोत्सवात मांडला.
कॅम्प येथील बी.के. मॉडेल हायस्कूलच्या शताब्दी समारोह सप्ताहात आयोजित कार्यक्रमात ते प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. यावेळी बेळगाव उत्तरचे आमदार राजू शेठ हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.
सचिन पिळगावकर म्हणाले, “मी गरीब कुटुंबात जन्मलो. लहान वयातच कुटुंबाची जबाबदारी माझ्यावर आली. त्यामुळे औपचारिक शिक्षण पूर्ण करता आलं नाही. एकदा शिक्षण हातून निसटलं की ते परत मिळवणं अवघड होतं. म्हणूनच शिकणं कधीही थांबवू नये.”
चारव्या वर्षी अभिनय, पाचव्या वर्षी राष्ट्रीय पुरस्कार आणि सहाव्या वर्षी कुटुंबाची जबाबदारी स्वीकारलेला हा प्रवास सांगताना त्यांनी उपस्थितांना भावूक केले. चित्रपटात काम करताना शिक्षणाकडे दुर्लक्ष झालं, मात्र शिक्षकांनी दाखवलेली आपुलकी आणि मार्गदर्शन आयुष्यभर सोबत राहिल्याचे त्यांनी नमूद केले.

सचिन पिळगावकर यांनी आपल्या ओघवत्या शैलीत स्त्रीशक्तीचे महत्त्व विषद केले. स्त्री-पुरुष समान आहेत असे वारंवार ऐकायला मिळते, मात्र सद्यस्थिती वेगळी असून स्त्री ही सर्वार्थाने पुरुषापेक्षा श्रेष्ठ आहे. म्हणूनच परमेश्वराने तिला ‘आई’ होण्याचा सर्वोच्च मान दिला आहे. आपण आपल्या देशाला भारतमाता म्हणतो, भारतपिता नाही, हेच स्त्रीचे श्रेष्ठत्व सिद्ध करण्यास पुरेसे आहे. असे त्यांनी नमूद केले.

चित्रपटसृष्टीतील झगमगाटापेक्षा कष्ट आणि शिस्त महत्त्वाची असल्याचं सांगत त्यांनी मीनाकुमारी यांच्यामुळे उर्दू भाषा शिकता आल्याचा अनुभवही शेअर केला.१९७५ मध्ये ‘शोले’ आणि ‘गीत गाता चल’ या चित्रपटांनी आयुष्याला कलाटणी दिल्याचा उल्लेख करताना त्यांनी ‘शोले’तील क्लायमॅक्स आणि आपल्या मृत्यूच्या दृश्याचा किस्साही रंगतदारपणे सांगितला.


कार्यक्रमात आमदार राजू सेठ यांनी शाळेच्या शताब्दी महोत्सवाचे महत्त्व विशद करताना, “शिक्षक हे केवळ धडे देत नाहीत, तर राष्ट्र घडवतात. बालपणीची मैत्री आणि शाळेचे संस्कार आयुष्यभर सोबत राहतात,” असे मत व्यक्त केले.
प्रारंभी संस्थेचे अध्यक्ष अविनाश पोतदार यांनी मान्यवरांचे स्वागत केले. शाळेच्या शंभर वर्षांच्या वाटचालीला साजेसा असा हा कार्यक्रम प्रेरणा आणि आत्मपरीक्षण घडवणारा ठरला.

 belgaum
 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.