belgaum

आधुनिकतेच्या झगमगाटात टिकून असलेली नैसर्गिक गुळाची ४५ वर्षांची परंपरा

0
496
 belgaum


बेळगाव लाईव्ह विशेष:सध्या गुळाचा हंगाम सुरू झाला असून बाजारात केमिकलयुक्त तसेच सेंद्रिय गूळ मोठ्या प्रमाणात उपलब्ध होऊ लागला आहे. अलीकडच्या काळात आरोग्याबाबत वाढलेल्या जागरूकतेमुळे केमिकलयुक्त पदार्थ टाळण्याकडे नागरिकांचा कल वाढत आहे. त्यामुळे नैसर्गिक पद्धतीने तयार होणाऱ्या पदार्थांना विशेष मागणी निर्माण झाली आहे.

रोगप्रतिकारक शक्ती वाढविणे, पचनशक्ती सुधारणे यासह अनेक औषधी गुणधर्म असलेला गूळ बाजारात सहज मिळतो. मात्र पारंपरिक आणि पूर्णतः नैसर्गिक पद्धतीने तयार केलेला गूळ आजकाल फारच कमी प्रमाणात उपलब्ध आहे. तरीही गेल्या चार दशकांहून अधिक काळापासून काही ऊस उत्पादक पारंपरिक पद्धतीने गूळ निर्मिती करत आपला व्यवसाय निष्ठेने जपत आहेत.

सध्याच्या आधुनिक युगात उसाचे पारंपरिक गुऱ्हाळ नामशेष होण्याच्या मार्गावर असताना, बेळगाव तालुक्यातील मोदगा येथील शेतकरी शिवाजी गुराप्पा अष्टेकर यांनी आपल्या वडिलोपार्जित परंपरेला आजही जिवंत ठेवले आहे. गेल्या ४५ वर्षांहून अधिक काळापासून अष्टेकर कुटुंब नैसर्गिक पद्धतीने गुळ उत्पादन करत असून, कोणत्याही रसायनांशिवाय तयार होणारा हा गूळ आजही ग्राहकांच्या पसंतीस उतरतो आहे.


मोदगा गावातील पारंपरिक गुळ उत्पादक म्हणून ओळख असलेले शिवाजी अष्टेकर यांनी वडिलांकडून मिळालेला हा व्यवसाय सातत्याने पुढे चालवला आहे. त्यांच्या गुऱ्हाळात उसाचा रस नैसर्गिक पद्धतीने उकळून गूळ तयार केला जातो. रसायनांचा वापर पूर्णतः टाळला जात असल्यामुळे हा गूळ आरोग्यदायी मानला जातो. गेल्या चार दशकांहून अधिक काळ चालू असलेल्या या व्यवसायामुळे परिसरातील ऊस शेतीला मोठा आधार मिळाला आहे.


पूर्वी मोदगा परिसरात ३० ते ३५ उसाचे घाणे (गुऱ्हाळ) कार्यरत होते. मात्र कालांतराने कामगारांच्या कमतरतेमुळे आज केवळ ३ गुऱ्हाळेच शिल्लक राहिली आहेत. अष्टेकर यांचे गुऱ्हाळ वर्षातील सुमारे चार महिने सुरू असते. ऑक्टोबर ते फेब्रुवारी या कालावधीत मोदगा परिसरातील ऊस येथे प्रक्रिया करण्यासाठी आणला जातो.


दररोज ६ काविली (रादाप) काढल्या जात असून, प्रत्येक काविलीसाठी सुमारे ८०० लिटर उसाचा रस वापरला जातो. त्यामधून प्रत्येकी १५० ते १८० किलो गुळाचे उत्पादन होते. तयार होणारा गूळ ५ ते १० किलो वजनाच्या ढेपींमध्ये विक्रीसाठी उपलब्ध केला जातो. स्थानिक बाजारात या गुळाला चांगली मागणी आहे.
या गुऱ्हाळात दररोज १५ ते १६ कामगार कार्यरत असून, ऊस गोळा करणे, कुटणे, रस काढणे व उकळणे अशी विविध कामे येथे केली जातात. परिसरातील बहुसंख्य गुऱ्हाळे बंद पडल्यामुळे, पारंपरिक नैसर्गिक गुळ उत्पादन टिकवण्यासाठी अष्टेकर कुटुंब सातत्याने प्रयत्न करत आहे. कामगारांची समस्या कायम असली तरी, आरोग्यदायी नैसर्गिक गुळाला आजही मागणी वाढताना दिसत आहे.


आपल्या व्यवसायाबाबत बेळगाव लाईव्हशी बोलताना शिवाजी अष्टेकर म्हणाले,
“नैसर्गिक गुळ उत्पादनाचा हा व्यवसाय आमच्या वाडवडिलांपासून सुरू आहे. मोदगा गाव हे पूर्वी नैसर्गिक गुळासाठी प्रसिद्ध होते. मात्र कामगारांच्या समस्येमुळे अनेक गुऱ्हाळे बंद पडली आहेत.”
ते पुढे म्हणाले, “आज बाजारात साखर व रसायने मिसळून तयार होणारा गूळ मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे, त्यामुळे आमच्या नैसर्गिक गुळाची मागणी काहीशी कमी झाली आहे. तरीही स्थानिक ग्राहकांसह इंग्लंड व अमेरिकेत स्थायिक झालेले बेळगाव भागातील नागरिक आवर्जून आमचा गूळ घेऊन जातात.”


अष्टेकर यांच्या गुऱ्हाळातील गूळ पूर्णपणे उसाच्या रसापासून तयार केला जातो. कोणतेही रसायन न वापरता तयार होणारा हा गूळ सध्या प्रति किलो ६० रुपये दराने विकला जात आहे. गावासह रविवार पेठ, बेळगाव आणि एपीएमसी मार्केट यार्ड येथे या गुळाची विक्री केली जाते.
“डॉक्टरदेखील आरोग्याच्या दृष्टीने साखरेऐवजी गूळ खाण्याचा सल्ला देतात. आमचा गूळ भेसळमुक्त व नैसर्गिक असल्यामुळे मधुमेही रुग्णांनाही मर्यादित प्रमाणात तो चालू शकतो,” असेही शिवाजी अष्टेकर यांनी स्पष्ट केले.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.