बेळगाव लाईव्ह :बेळगाव जिल्ह्यातील अथणी न्यायालयात गुरुवारी धक्कादायक प्रकार घडला आहे. न्यायालयीन कामकाज सुरू असताना एका महिलेचा खून करण्याचा प्रयत्न झाल्याने कोर्ट परिसरात खळबळ माजली.
मीनाक्षी रामचंद्र शिंदे (वय 50) असे हल्ला झालेल्या महिलेचे नाव असून त्यांच्यावर दवाखान्यात उपचार सुरू आहेत. कोतनटी येथील बाबासाहेब चव्हाण हा आरोपी असून त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
सूत्रांनुसार, संपत्तीच्या वादातून मीनाक्षी व बाबासाहेब यांच्यात गेल्या काही महिन्यांपासून वाद सुरू होता. आज सकाळी मीनाक्षी यांच्या मागे लागून आरोपीने कुऱ्हाडीने हल्ला करण्याचा प्रयत्न केला. जीव वाचवण्यासाठी त्यांनी कोर्ट हॉलमध्ये शिरताच, हा प्रकार प्रधान दिवाणी न्यायाधीशांच्या समोरच घडला. अचानक झालेल्या या प्रकारामुळे न्यायालयात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
घटनेनंतर तत्काळ हस्तक्षेप करून पोलिसांनी आरोपीला अटक केली. या प्रकरणाने संपूर्ण कोर्ट परिसरात गोंधळ उडाला असून पुढील तपास सुरू आहे.




