बेळगाव येथे होणाऱ्या हिवाळी अधिवेशनामध्ये राज्य विधिमंडळ महाविद्यालयीन आणि विद्यापीठांच्या विद्यार्थ्यांकरिता अधिवेशन कामकाजाचा अभ्यास करण्यासाठी इंटर्नशिप अर्थात अंतर्गत प्रशिक्षण कार्यक्रम सुरू करत आहे, असे सभापती यु. टी. खादर यांनी बुधवारी बेळगाव येथे सांगितले.
पत्रकारांशी बोलताना सभापती खादर यांनी सांगितले की, विद्यार्थ्यांचा एक निवडक गट विधानसभेच्या सत्राचे संपूर्ण दिवस निरीक्षण करू शकेल आणि सुवर्ण सौध येथील ग्रंथालयात प्रवेश मिळवू शकेल. विद्यार्थी विविध क्षेत्रातील व्यक्तींकडून दिल्या जाणाऱ्या प्रेरक व्याख्यानांनाही उपस्थित राहतील. ही सुविधा किमान 30 विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध असेल. त्यांची निवड राणी चन्नम्मा विद्यापीठ, कर्नाटक विद्यापीठ आणि कर्नाटक राज्य अक्का महादेवी महिला विद्यापीठातून केली जाईल.
आम्हाला विद्यार्थ्यांमध्ये कायदेविषयक प्रक्रियेबद्दल आणि संविधानवादाच्या भावनेबद्दल जागरूकता पसरवायची आहे. आम्हाला आशा आहे की अशा इंटर्नशिप कार्यक्रमामुळे त्यांना मदत होईल. इंटर्नव्यतिरिक्त सुमारे 500 विद्यार्थ्यांना दररोज कामकाज पाहण्याची परवानगी दिली जाईल. शिक्षण विभागाला त्यांच्या भेटीच्या दिवसाच्या एक आठवडा आधी विद्यार्थ्यांची यादी सादर करण्यास सांगितले जाईल, अशी माहिती सभापती यु. टी. खादर यांनी पुढे दिली.




