बेळगाव लाईव्ह :8 डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान कोणतीही त्रुटी राहू नये. अधिकारी आपापली जबाबदारी काटेकोरपणे पार पाडून हे अधिवेशन यशस्वी करावे, असे निर्देश विधानसभेचे अध्यक्ष यू. टी. खादर फरीद यांनी दिले.सुवर्ण विधानसौध येथे आज (19 नोव्हेंबर) घेतलेल्या अधिवेशनपूर्व तयारी बैठकीत ते बोलत होते.
8 ते 20 डिसेंबरदरम्यान होणाऱ्या अधिवेशनासाठी नियुक्त अधिकारी व कर्मचारी बांधिलकीने काम करून अधिवेशन निर्विघ्न पार पाडावे. अधिवेशनादरम्यान उद्भवणाऱ्या कोणत्याही समस्यांची तात्काळ नोंद घ्यावी व त्या सोडवाव्यात, असेही त्यांनी सांगितले.
दूरसंचार आणि नेटवर्क अडचणी उद्भवू नयेत यासाठी योग्य काळजी घ्यावी. आवश्यक संगणक सामग्री व इतर सुविधा उपलब्ध करून द्याव्या.अधिवेशनादरम्यान आंदोलनकर्त्यांसाठी स्वतंत्र जागा निश्चित करावी आणि त्या ठिकाणी आवश्यक सुविधा व पुरेशी पोलिस बंदोबस्ताची व्यवस्था करावी, असे त्यांनी स्पष्ट केले.
सार्वजनिक माहिती केंद्राची स्थापना
सुवर्ण विधानसौध परिसरात सुरक्षाव्यवस्था व वाहतूक व्यवस्थापन काटेकोरपणे करावे. अधिवेशनादरम्यान येणाऱ्या नागरिकांसाठी सहाय्यवाणी केंद्र (हेल्प डेस्क) उभारावे, अशा सूचना अध्यक्षांनी दिल्या.
मागील वर्षाप्रमाणे यावर्षीदेखील सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करावे. तसेच मागीलवेळी आमदारांनी परिसरात झाडे लावली होती; यावर्षीही प्रत्येक आमदाराकडून झाडे लावण्याची व्यवस्था करावी, असे सांगितले.अधिवेशनासाठी दिल्या जाणाऱ्या पासेसमध्ये कुठलाही गोंधळ होणार नाही याची काळजी घ्यावी. पास वितरणासाठी पोलिस विभागाशी समन्वय ठेवावा. नागरिक, शालेय विद्यार्थी यांना कलापांचे (प्रोसीडिंग्जचे) निरीक्षण करण्यासाठी योग्य वेळ ठरवावा, असेही त्यांनी म्हटले.
शाळा–महाविद्यालयीन विद्यार्थी, स्वच्छता कामगार, तृतीयपंथी व महिलांना सभागृहातील कार्यवाही पाहण्याची विशेष संधी उपलब्ध करून देण्याची तयारी असल्याचे त्यांनी सांगितले.
विधानपरिषद सभापती बसवराज होरट्टी यांचे निर्देश
विधानपरिषद सभापती बसवराज होरट्टी यांनी सांगितले :• मंत्री, आमदार तसेच मंत्रालयातील अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी योग्य निवास व वाहतूक व्यवस्था करावी.
• अधिवेशनादरम्यान मंत्री व आमदार ज्या हॉटेलमध्ये मुक्काम करतील, तेथे डॉक्टरांची विशेष टीम नेमावी. सुवर्ण विधानसौधमध्येही सुसज्ज रुग्णवाहिकेसहित वैद्यकीय पथक तैनात करावे.
• राणी चन्नम्मा विद्यापीठ, कर्नाटक विद्यापीठ व अक्कमहादेवी विद्यापीठातील निवडलेल्या 30 विद्यार्थ्यांना अधिवेशनकार्य पाहण्यासाठी अधिक वेळ देण्याची व्यवस्था करावी.

जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी दिलेली माहिती
जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले की, अधिवेशनाच्या पूर्वतयारीसाठी मागील वर्षाप्रमाणे 12 समित्या स्थापन करण्यात आल्या असून सर्व समित्यांना त्यांची जबाबदारी बजावण्याचे निर्देश दिले आहेत.
पोलिस आयुक्त गुलाबराव भूषण भोरसे यांचे मत
अधिवेशना दरम्यान कायदा–सुव्यवस्थेसाठी आवश्यक पोलिस बंदोबस्त पुरविण्यात येणार आहे. इतर जिल्ह्यांतूनही अतिरिक्त पोलिस कर्मचारी नेमले जातील. पोलिस कर्मचार्यांसाठी निवास व भोजनाचीही व्यवस्था केली जात आहे.
विधानसभा उपाध्यक्ष रुद्रप्पा लमाणी, आमदार राजू (आसिफ) सेठ, विधानसभा कार्यदर्शी विशालाक्षी, विधानपरिषद कार्यदर्शी महालक्ष्मी, जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. भीमाशंकर गुलेद, जिल्हा पंचायत मुख्यकार्यकारी अधिकारी राहुल शिंदे व विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
या प्रसंगी विधानपरिषद सभापती बसवराज होरट्टी यांनी ‘राष्ट्रीय ऐक्य शपथ’ दिली.
त्यानंतर विविध सभागृहांची पाहणी करून ध्वनी व्यवस्था, स्वच्छता आणि इतर तयारीचे निर्देश दिले.


