बेळगाव लाईव्ह :बेळगाव येथील भुतरामनहट्टी राणी चन्नम्मा मिनी झूमध्ये संकट अधिक गडद झाले असून संकटग्रस्त व संरक्षित प्रजाती असलेल्या काळवीटांचा होत असलेल्या मृत्यूचा आकडा 29 वर पोहोचला आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात होत असलेल्या काळवीट मृत्यूने प्राणी संग्रहालय प्रशासनातील कार्यप्रणाली, पशुवैद्यकीय उपचार व वनविभागाची जबाबदारी यावर जोरदार टीका केली जात आहे.
गेल्या तीन दिवसांत संशयित जीवाणूजन्य संसर्गामुळे 28 काळवीटांचा मृत्यू झाला होता. रविवारी संध्याकाळी आणखी एका नर काळवीटाचा मृत्यू झाल्याची पुष्टी झू प्रशासनाने केली.
मृत काळवीटांपैकी 13 नर तर उर्वरित माद्या असल्याचे समोर आले आहे. तज्ज्ञ पशुवैद्यकांच्या मार्गदर्शनाखाली खबरदारीचे उपाय व उपचार वाढवण्यात आल्याचे झू प्रशासनाने सांगितले असले तरी परिस्थिती सतत गंभीर होत असून पशुवैद्यकीय विभाग व वनाधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत.
मूळतः या मिनी झूमध्ये 38 काळवीटांचा अधिवास होता. हे प्राणी सुमारे चार ते पाच वर्षांपूर्वी गदग झूपासून येथे आणण्यात आले होते. साधारण चार ते सहा वर्षे वयोगटातील हे काळवीट संरक्षित प्रजातींच्या संवर्धनासाठी महत्त्वपूर्ण होती. संसर्गित प्राण्यांची वेळीच ओळख व त्यांना कळपापासून तात्काळ वेगळे न करण्याच्या दुर्लक्षामुळे इतका मोठा जीवितहानीचा धोका निर्माण झाल्याची तज्ज्ञांकडून टीका होत आहे.
पहिल्या आठ मृत्यूंनंतर शवविच्छेदन करून नमुने संकलित करण्यात आले असून ते बन्नरघट्टा प्रयोगशाळेत तपासासाठी पाठवण्यात आले आहेत. संसर्गाचा पुढील प्रसार रोखण्यासाठी मृत प्राण्यांचे शव जाळण्यात आल्याचे प्रशासनाने सांगितले.
संरक्षित व विलुप्तप्राय प्रजातींच्या इतक्या मोठ्या प्रमाणातील मृत्यूमुळे जनक्षोभ वाढला असून या प्रकरणी झू प्रशासनातील कार्यप्रणाली, पशुवैद्यकीय उपचार व वनविभागाची जबाबदारी यावर कठोर चौकशीची मागणी होत आहे.





