बेळगाव लाईव्ह : राज्याच्या सर्वात मोठ्या जिल्ह्यात असणारी बेळगाव जिल्हा मध्यवर्ती बँक सहकार क्षेत्रातील अग्रगण्य बैंक म्हणून ओळखली जाते. नुकत्याच झालेल्या या बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत जारकीहोळी-जोल्ले पॅनेलने बहुमत मिळवले आहे. त्यामुळे सोमवारी होणाऱ्या बँकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत कोण बाजी मारणार, याकडे सहकार क्षेत्राबरोबर निपाणी व चिकोडी तालुक्याचे अधिक लक्ष लागून राहिले आहे.
नव्या अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीसाठी निवडणूक जाहीर झाली असून सोमवार 10 रोजी संचालक मंडळाच्या बैठकीत ही निवड जाहीर केली जाणार आहे. अध्यक्षपदाच्या
नाव निवडणुकीत माजी खासदार अण्णासाहेब जोल्ले यांचे अग्रस्थानी असल्याचे समजते. रमेश कत्ती यांच्या राजीनाम्यानंतर अध्यक्षपदाच्या निवडीवेळी जोल्ले यांचे नाव आघाडीवर होते. परंतु ऐनवेळी अप्पासाहेब कुलगुडे यांना संधी मिळाली. आमदार भालचंद्र जारकीहोळी यांनी बँकेच्या अध्यक्षपदी लिंगायत समाजाच्या संचालकाची निवड केली जाईल, अशी घोषणा केल्याने अध्यक्षपदासाठी माजी खा. अण्णासाहेब जोल्ले, महतिश दोड्डूगौडर, आ. राजू कागे, आ. गणेश हुक्केरी, आ. विश्वास वैद्य, आ. चनराज हट्टीहोळी इच्छुक आहेत. पालकमंत्री सतीश जारकीहोळी व आमदार
भालचंद्र जारकीहोळी हे बंधू अध्यक्षपदाची माळ कोणाच्या गळ्यात घालतात, याकडे सहकार क्षेत्राबरोबर जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे.पीकेपीएस सोसायटीमधून जिल्हा मध्यवर्ती बँकेवर १५ संचालक निवडून गेले आहेत. इतर संस्थांमधून एक संचालक निवडला गेला आहे.
बेळगाव जिल्हा मध्यवर्ती बँकेने आजवर जिल्ह्यातील बहुतांश शेतकऱ्यांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देताना कृषी कर्ज मिळवून दिले आहे. शासनाच्या धोरणानुसार कर्जमाफीचा लाभदेखील शेतकऱ्यांना मिळाला आहे.
सहकारातील अग्रेसर असणाऱ्या या जिल्हा बँकेवर राजकीय प्रभाव देखील नेहमीच दिसून आला आहे. पण बँकेच्या माध्यमातून राजकारणकोणीच केलेले नाही, वेगवेगळ्या पक्षाचे नेते एकत्र येऊन आजतागायत कार्य करत आहेत.
सध्यस्थिती पाहता जिल्हा बँकेवर जारकीहोळी बंधूंचा प्रभाव अधिक दिसून येतो. त्यामुळे जारकीहोळी ठरवतील त्यांच्याच गळ्यात अध्यक्षपदाची माळ पडणार आहे.




