बेळगाव लाईव्ह विशेष : छत्रपती शिवाजी महाराजांविषयी वादग्रस्त वक्तव्य केल्याबद्दल सकल मराठा समाज आक्रमक झाला असून, साहित्यिक वाय. आर. पाटील यांच्या वक्तव्याचा त्यांनी तीव्र शब्दांत निषेध केला आहे. ‘वाय. आर. पाटील यांचे डोके ठिकाणावर आहे का?’ असा थेट सवाल सकल मराठा समाजाचे अध्यक्ष गुणवंत पाटील यांनी केला आहे.
या संदर्भात प्रतिक्रिया व्यक्त करताना गुणवंत पाटील म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांचे मातेकडील घर जाधव आणि पित्याकडील घर भोसले आहे. त्यांचे सगेसोयरे संपूर्ण महाराष्ट्रात असताना आणि ते मराठी असताना वाय. आर. पाटील यांना छत्रपती शिवाजी महाराज लिंगायत कसे वाटले? त्यांच्या वक्तव्याचा निषेध करणे अत्यंत गरजेचे आहे.
गुणवंत पाटील यांनी वाय. आर. पाटील यांचे अशा पद्धतीचे वक्तव्य करत असतील, तर ते त्यांच्या वैचारिक दिवाळखोरीचे लक्षण आहे.रा. ची. ढेरे आणि दक्षिण भारतातील संस्कृती यांसारख्या विषयांवर संशोधन केले तरी, छत्रपती शिवाजी महाराज लिंगायत होते, अशा पद्धतीचे कोणतेही वक्तव्य किंवा लिखाण केलेले नाही. इतरांचा संदर्भ घेऊन वाय. आर. पाटील बोलत असतील, तर ते अत्यंत विपरीत आणि चुकीचे आहे, असे गुणवंत पाटील यांनी स्पष्ट केले.
छत्रपती शिवाजी महाराजांना कन्नड भाषेचे ज्ञान अवगत होते, अशा पद्धतीचे वक्तव्यही वाय. आर. पाटील करत आहेत. याचा अर्थ शिवाजी महाराजांचा काही कालखंड दक्षिण भारतात गेल्यामुळे त्यांना बऱ्याच भाषा अवगत असण्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र, याचा अर्थ एखाद्या व्यक्तीचे वास्तव्य दुसऱ्या प्रदेशात असेल तर त्यांची मातृभाषा तीच होते, असा होत नाही. मातृभाषा ही माता-पित्यांकडून मिळालेली भाषा मानली जाते. त्याचप्रमाणे, शिवाजी महाराज आणि अनेक महापुरुष कोणत्या जातीत जन्माला आले, यापेक्षा त्यांचे कार्य, कर्तृत्व, त्यांनी दिलेले योगदान आणि त्यांची तत्त्वे याचे अनुसरण करणे महत्त्वाचे असते, असे मत त्यांनी मांडले.
वाय. आर. पाटील यांना या सर्व गोष्टी दिसत नसून, छत्रपती शिवाजी महाराजांविषयी जात काढणे, यातून त्यांच्या बुद्धीची कीव करावीशी वाटते. शिवाजी महाराजांविषयी कोणीही वक्तव्य करत असेल, तर ते जबाबदारीने आणि माहिती घेऊन केले पाहिजे. अशी वक्तव्ये निश्चितच समाजात तेढ निर्माण करणारी असून, सामाजिक शांततेसाठी हानिकारक आहेत, हे समजून घेणे गरजेचे आहे.
सकल मराठा समाजाने अनेकदा लोकांना समजावूनही शिवाजी महाराजांबद्दल अशी वाह्यात वक्तव्ये होणे दुर्दैव आहे. याची दखल सकल मराठा समाज नक्कीच घेईल. वाय. आर .पाटील यांनी केलेल्या या वक्तव्याचा सकल मराठा समाजाच्या वतीने जाहीर निषेध करण्यात येत आहे, अशी प्रतिक्रिया गुणवंत पाटील यांनी व्यक्त केली.




