बेळगाव लाईव्ह–वेंगुर्ला रोडवर सुळगा परिसरात दुरुस्तीच्या कामासाठी टाकलेली खडी जीवघेणी ठरत असून रविवारी चार दुचाकीस्वार घसरून जखमी झाले. कामाचा वेग मंदावल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.
बेळगाव–वेंगुर्ला रोडवरील उचगाव क्रॉस ते बाची पर्यंत रस्ता दुरुस्तीचे काम सुरू आहे. रस्ता दुरुस्तीच्या कामामुळे रस्त्यावर टाकण्यात आलेली खडी दुचाकीस्वारांसाठी धोकादायक ठरत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून या ठिकाणी खडीचा थर तसाच असल्याने वाहनचालकांना तोल संभाळणे कठीण होत आहे.
रविवारी चार दुचाकीस्वार या खडीवरून घसरून किरकोळ जखमी झाल्याचे समजते. धुळीचे प्रमाणही वाढल्याने वाहनधारक त्रस्त झाले आहेत.
स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे की, दुरुस्तीचे काम अत्यंत मंद गतीने सुरू असून सार्वजनिक बांधकाम विभागाने (PWD) तातडीने लक्ष घालून खडी घट्ट दाबून रस्ता समतल करावा किंवा पर्यायी मार्गाची सोय करावी, अशी मागणी होत आहे.
हा रस्ता सुधारण्याची मागणी मागील अनेक वर्षांपासून प्रलंबित होती. दुरुस्तीला सुरुवात झाली असली तरी काम कधी पूर्ण होणार? असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.


