बेळगाव लाईव्ह: खानापूर तालुक्यातील सुलेगाळी येथे घडलेल्या धक्कादायक घटनेत दोन जंगली हत्तींचा विद्युत प्रवाह लागून जागीच मृत्यू झाला आहे. प्राथमिक माहितीनुसार, हेस्कॉम खात्याच्या दुर्लक्षामुळे तुटून पडलेल्या विद्युत तारेच्या संपर्कात येऊन ही दुर्दैवी घटना घडल्याचे स्पष्ट झाले आहे.
घटनेची सविस्तर माहिती अशी की, देवराई गावाजवळील सुलेगाळी येथील शेतकरी गणपती सातेरी गुरव व परिसरातील इतर शेतकऱ्यांनी वन्य प्राण्यांपासून शेतीचे संरक्षण करण्यासाठी सौर ऊर्जेवर चालणारे झटका करंट मशीन बसवले होते. अशा प्रकारचे मशीन तालुक्यातील अनेक शेतकरी वापरत असले तरी, हेस्कॉमच्या निष्काळजीपणामुळे शेतातून गेलेली वीजवाहिनी तुटून काही दिवसांपासून जमिनीवर पडलेली होती.
तरीही, वीज खात्याकडून कोणतीही दखल घेण्यात आली नाही. शनिवारी आणखी एक तार तुटून पडल्याने ती झटका करंटच्या तारेच्या संपर्कात आली. त्यामुळे त्या तारेतून विद्युत प्रवाह सुरू झाला. दरम्यान, अन्नाच्या शोधात त्या ठिकाणी आलेले दोन जंगली हत्ती त्या तारेच्या संपर्कात आले आणि दोघांचाही जागीच मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच वन विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पंचनामा करून दोन्ही हत्तींच्या मृतदेहांची तपासणी केली असून, आवश्यक कायदेशीर सोपस्कार सुरू केले आहेत.
या घटनेनंतर हलगा गावचे रहिवासी व सामाजिक कार्यकर्ते रणजीत पाटील घटनास्थळी पोहोचले. त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की,
“ही दुर्घटना हेस्कॉम खात्याच्या स्पष्ट दुर्लक्षामुळे घडली आहे. तुटलेल्या तारांची दुरुस्ती वेळेत करण्यात आली असती, तर हे दोन निरपराध प्राणी वाचले असते. त्यामुळे संबंधित हेस्कॉम कर्मचारी व अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी,” अशी मागणी त्यांनी केली.
स्थानिक नागरिकांमध्ये या घटनेबद्दल तीव्र नाराजी व्यक्त होत असून, वन्यजीव संरक्षण आणि विद्युत विभागाच्या निष्काळजीपणाबाबत प्रशासनाने तत्काळ दखल घ्यावी, अशी मागणी केली जात आहे.
तुटलेल्या हेस्कॉम तारेचा झटका करंट तारेला स्पर्श
ही घटना पुन्हा एकदा दाखवून देते की, वीज खात्याच्या निष्काळजीपणामुळे वन्यजीवांसह नागरिकांच्या जीवितासही धोका निर्माण होत आहे. वेळेवर दुरुस्ती न झाल्यास भविष्यात आणखी गंभीर घटना घडू शकतात. त्यामुळे हेस्कॉम खात्याने धोकादायक तारांचे निरीक्षण करून तात्काळ दुरुस्ती करणे अत्यावश्यक आहे.


