बेळगाव लाईव्ह : बेळगावजवळील भूतरामनहट्टी येथील राणी कित्तूर चन्नम्मा लघु प्राणीसंग्रहालयातील वातावरण सध्या चिंताजनक आहे. कारण, गेल्या काही दिवसांत येथे तब्बल २८ काळविटांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. हा आकडा मोठा असल्याने आणि मृत्यूचे कारण संसर्गजन्य असण्याची शक्यता असल्याने वन विभागात एकच खळबळ उडाली आहे.
प्राथमिक माहितीनुसार, हा मृत्यू जिवाणू संसर्गामुळे झाला असावा, अशी भीती व्यक्त होत आहे. मरण पावलेल्यांमध्ये सुरुवातीला ८ हरणे होती, त्यानंतर आज आणखी २० हरणे एकाएकी मरण पावली. या घटनेची माहिती वनमंत्री ईश्वर खंड्रे यांच्यापर्यंत पोहोचताच त्यांनी त्वरित या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.
प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार, पशुवैद्यकांनी केलेल्या तपासणीनंतर जिवाणू संसर्गामुळेच काळविटांचा मृत्यू झाला असावा, असे प्राथमिक अनुमान आहे. या पार्श्वभूमीवर, मृत्यूच्या नेमक्या कारणांचा आणि संसर्गाच्या स्त्रोताचा शोध घेण्यासाठी म्हैसूर आणि बन्नेरघट्टा येथील तज्ज्ञ डॉक्टरांचे विशेष पथक आज संध्याकाळपर्यंत बेळगावला दाखल होत आहे.
ए.सी.एफ. नागराज यांनी माहिती देताना सांगितले की, “सध्या सर्व मृत काळविटांचे मरणोत्तर परीक्षण करून नमुने पुढील तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत. सुरुवातीला ८ काळविट मरण पावल्यानंतरच आम्ही म्हैसूरच्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार काळजी आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरू केल्या होत्या. सद्यस्थितीत इतर कोणत्याही प्राण्यांमध्ये संसर्गाची लक्षणे आढळलेली नाहीत.”
दुसरीकडे, या संवेदनशील प्रकरणात वनपरिक्षेत्र अधिकारी पवन करनिंग यांच्याकडून योग्य आणि त्वरित माहिती मिळत नसल्यामुळे प्रशासनावर आणि त्यांच्या कार्यशैलीवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. राणी चन्नम्मा प्राणीसंग्रहालयाच्या इतिहासातील एवढ्या मोठ्या संख्येने प्राण्यांचा मृत्यू होण्याची ही पहिलीच घटना असल्याने येथील उर्वरित हरणांच्या आरोग्याची काळजी घेणे हे प्रशासनासमोर मोठे आव्हान आहे.


