Saturday, December 6, 2025

/

बेळगावच्या रस्त्यांवर ‘ट्रॅफिक टेरर’!

 belgaum

बेळगाव लाईव्ह : बेळगाव शहर सध्या वाहतूक कोंडीच्या मोठ्या समस्येने ग्रासले असून, येथील परिस्थिती आता एखाद्या मेट्रोसिटीतील ‘ट्रॅफिक जाम’प्रमाणे झाली आहे. शहरात रोज सकाळी वाहतुकीचा मोठा जाम, दुपारी मेगा ब्लॉक आणि रात्री पुन्हा मोठा जाम असे चक्र सुरू आहे. शुक्रवारी सायंकाळी राणी चन्नम्मा नगर, टिळकवाडी परिसर आणि उद्यमबाग रोड यांसारख्या प्रमुख मार्गांवर दूरवर लांबच लांब वाहनांच्या रांगा लागल्याचे दिसून आले. विशेषतः थर्ड गेट, उद्यमबाग, राणी चन्नम्मा नगर परिसरात वाहतुकीची अक्षरशः ठप्प वाटचाल असून, राणा प्रताप हिंदू नगर ते टिळकवाडी रस्ता पूर्णपणे अडखळला आहे. बुधवारी रात्री तर ट्रॅफिकचा तीन तेरा वाजल्यामुळे लोक हैराण झाले होते.

या गंभीर समस्येमागे बेळगाव महानगरपालिका आणि प्रशासनाचा ‘महंमद बिन तुघलकी’ कारभार कारणीभूत आहे अशी टिप्पणी नागरिक करत आहेत. शहरात एवढी वाहतूक कोंडी होत असतानाही, रहदारी विभागाचे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे. रहदारी पोलीस विभाग एखादा नियम आला की, त्याची अंमलबजावणी करण्यासाठी चौकाचौकात छुप्या जागेत तत्परतेने कारवाईचा बडगा उगारण्यात येतो; मात्र दुसरीकडे नागरिकांना मिळणाऱ्या सुविधांचा विचार केला तर, स्थिती ‘ठणठण गोपाळ’ आहे. खड्डेमय रस्ते, धुळीचे साम्राज्य, बेशिस्त वाहतूक, अयोग्य सिग्नल यंत्रणा आणि अपघातांची वाढलेली मालिका या सर्व गोष्टी पाहता, नागरिकांकडून प्रत्येक प्रशासकीय कार्यवाहीवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे आणि वाहतूक विभाग नक्की काय काम करत आहे, असा संतप्त सवाल विचारला जात आहे.

सध्या शहर परिसरात अनेक ठिकाणी दुरुस्तीची कामे हाती घेण्यात आली आहेत. मात्र, ही कामे दिवसा करण्यात येत असल्यामुळे वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्यात आली आहे. याचा परिणाम म्हणजे अरुंद रस्ते आणि वाहनांची वाढलेली संख्या यामुळे प्रत्येक चौकात वाहतूक कोंडीची समस्या दिसून येत आहे. यामुळे दुरुस्तीची कामे रात्रीच्या वेळी करण्याची मागणीही जोर धरू लागली आहे. बेळगावमधील वाहतूक कोंडीला बेळगावकर आता पूर्णपणे वैतागले आहेत.

 belgaum

या कोंडीचे आणखी एक प्रमुख कारण म्हणजे एकेरी वाहतुकीचा फटका आहे. बऱ्याच दिवसांपासून तिसऱ्या रेल्वे उड्डाणपुलाची दुरुस्ती चालू होती, त्यामुळे वाहतूक कोंडी होत असावी असा नागरिकांमध्ये समज होता; परंतु कालपासून या उड्डाणपुलावरून वाहतुकीसाठी मार्ग मोकळा करण्यात आला असूनही, वाहतूक कोंडीची समस्या काही सुटलेली नाही. उलट, एकेरी वाहतूक केल्यामुळे पर्यायी मार्गावर वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात वाढली असून, हजारो नागरिक अडकून पडले आहेत, ज्यामुळे पर्यायी मार्ग नसलेल्या त्रस्त जनतेचे हाल सुरूच आहेत.

या सर्व समस्यांच्या पार्श्वभूमीवर, शहरात प्रस्तावित असलेल्या उड्डाणपुलांच्या  कामांना सुरुवात करण्यापूर्वी कॅम्प परिसरातील अरुंद रस्ते, हलगा मच्छे बायपास प्रकरणातील शेतकऱ्यांच्या समस्या आणि छत्रपती शिवाजी महाराज उद्यान परिसरातील समस्या अशा सर्व समस्या निकाली काढूनच हा प्रकल्प हाती घेण्यात यावा, असे महत्त्वपूर्ण पत्र वरिष्ठ अधिकारी आणि लोकप्रतिनिधींना देण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून उपलब्ध झाली आहे.

बेळगावमधील एकंदर समस्यांचा पाढा वाचता, प्रशासनाचा नियोजनाचा फज्जा उडाला आहे. जनक्षोभ आणि नागरिकांच्या भावनांचा उद्रेक होण्याची वाट प्रशासन पाहत आहे का, आणि अखेर हा गोंधळाचा खेळ कोण सोडवणार, असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करत आहेत

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.