बेळगाव लाईव्ह : स्थानिक नगरसेवक आणि महापालिकेच्या दुर्लक्षामुळे गेल्या दोन-चार वर्षांपासून जुने गांधीनगर येथील सुभाष गल्ली पहिला व दुसरा क्रॉस येथील रहिवाशांना तुंबलेल्या ड्रेनेजच्या गंभीर समस्येने ग्रासले असून विशेषतः लहान मुले आणि वयोवृद्धांचे आरोग्य धोक्यात आले आहे. त्यामुळे महापालिकेने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन सदर समस्येचे युद्धपातळीवर निवारण करण्याची जोरदार मागणी त्रस्त रहिवाशांकडून होत आहे.
जुने गांधीनगर येथील सुभाष गल्ली पहिला आणि दुसरा क्रॉस या ठिकाणी सुमारे दशकभरापूर्वी ड्रेनेज पाईपलाईन घालण्यात आली होती. तथापि, देखभाल न झाल्यामुळे गेल्या तीन-चार वर्षांपासून ही पाईपलाईन वारंवार तुंबत आहे. त्यामुळे स्थानिक रहिवाशांना अस्वच्छता आणि दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. अनेकदा सदर ड्रेनेज पाईपलाईन इतकी तुंबते की सांडपाणी उलटून घरातील शौचालयातून बाहेर पडते. पावसाळ्यात तर ड्रेनेजचे पाणी थेट घरात शिरते.
या परिस्थितीमुळे परिसरात सतत अस्वच्छता आणि दुर्गंधी पसरली असून डास-माशांचा प्रादुर्भाव वाढून लहान मुले व वयोवृद्धांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत आहे. गेल्या काही वर्षांत महापौर, आमदार आणि संबंधित अधिकाऱ्यांनी समस्या सोडवण्याची आश्वासने दिली असली तरी प्रत्यक्षात कोणतीही कारवाई झालेली नाही. त्यामुळे केवळ साफसफाई करून तोंडाला पाने पुसण्यापेक्षा विद्यमान पाईपलाईन काढून नवीन पाईपलाईन घालावी, अशी मागणी रहिवाशांकडून होत आहे.


यासंदर्भात बेळगाव लाईव्हशी बोलताना माजी नगरसेविका मंगल अर्जुन खटावकर म्हणाल्या की, “सुभाष गल्ली पहिला व दुसरा क्रॉस येथील ड्रेनेज पाईपलाईन माझ्या नगरसेवक कार्यकाळात घातली होती. परंतु त्यानंतर तिच्या देखभालीकडे दुर्लक्ष झाले. त्यामुळे ती सातत्याने तुंबण्याची समस्या निर्माण होते. पाईपलाईन बदलण्यासाठी मी दीड-दोन वर्षांपूर्वी महापालिकेकडे अर्ज केला होता, मात्र त्याकडे दुर्लक्ष झाले.”
त्या पुढे म्हणाल्या, “सांडपाण्यामुळे डासांचा प्रादुर्भाव वाढला असून घराघरातील शौचालयांतून ड्रेनेजचे पाणी शिरत आहे. तक्रारी करूनदेखील दखल घेतली जात नाही. आम्ही नियमित कर भरतो, तर आमच्या भागाच्या विकासासाठी हे पैसे वापरले जातात का, याचे उत्तर महापालिकेने द्यावे.”स्थानिक रहिवासी करीम जमादार यांनी देखील ड्रेनेजची समस्या तात्काळ सोडवण्याची मागणी केली.




