रेल्वे गेटच्या ठिकाणच्या समस्येकडे लक्ष देण्याची मागणी

0
11
 belgaum

बेळगाव लाईव्ह :
टिळकवाडी तिसऱ्या रेल्वे गेटवर ओव्हरब्रिजच्या रस्त्याचे काम सुरू असल्यामुळे आधीच काँग्रेस रोडवरील वाहतुकीचा ताण वाढलेला आहे. त्यात भर म्हणून सायंकाळनंतर पहिल्या आणि दुसऱ्या रेल्वे गेटच्या ठिकाणी रेल्वे गाड्या बराच वेळ थांबून राहतात. त्यामुळे या मार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी होत असून वाहनधारकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.

टिळकवाडी तिसऱ्या रेल्वे गेटवरील ओव्हरब्रिज रस्त्याचे काम सुरू असल्याने बेळगाव–खानापूर मार्गावरील वाहतूक काँग्रेस रोडकडे वळवण्यात आली आहे. वाहतूक सुरळीत राहावी म्हणून पोलिसांनी पहिल्या रेल्वे गेटप्रमाणे दुसऱ्या रेल्वे गेटजवळ खुला असलेला दुपदरी मार्ग बॅरिकेड्स लावून बंद केला आहे.

तसेच अनगोळ चौथ्या रेल्वे गेट येथे अंडरपासचे काम सुरू असल्याने तो मार्गही बंद आहे. परिणामी गेल्या आठवडाभरापासून काँग्रेस रोडच्या दोन्ही बाजूंच्या वाहतुकीचा ताण मोठ्या प्रमाणात वाढला आहे. याचा सर्वाधिक त्रास उद्यमबाग, अनगोळ, हिंदवाडी, शहापूर आदी भागांत जाणाऱ्या वाहनचालकांना होत आहे.

 belgaum


या पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसांपासून सायंकाळनंतर टिळकवाडी पहिल्या आणि दुसऱ्या रेल्वे गेटवर रेल्वे गाड्या सिग्नल न मिळाल्याने बराच काळ थांबून राहतात. त्यामुळे गेट बंद राहून काँग्रेस रोडवर रेल्वे गेटच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्यावर वाहनांची मोठी गर्दी होते.

वाहतूक कोंडीत अडकून तातडीच्या कामासाठी निघालेल्या वाहनचालकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. दोन्ही गेटवर निर्माण झालेल्या कोंडीचा फटका आपत्कालीन सेवा देणाऱ्या रुग्णवाहिकांनाही बसत आहे.


या दोन्ही रेल्वे गेटच्या ठिकाणी रहदारी पोलिसांची नियुक्ती केलेली असली तरी वाहतुकीचा ताण एवढा वाढला आहे की पोलिसांनाही ती नियंत्रणात ठेवणे कठीण होत आहे. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने या समस्येकडे गांभीर्याने लक्ष देऊन आवश्यक ती तातडीची कार्यवाही करावी, अशी वाहनचालकांकडून जोरदार मागणी होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.