बेळगाव लाईव्ह : यमकनमर्डी पोलीस स्थानकाच्या हद्दीतील हत्तरगी टोलनाक्याजवळ सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनादरम्यान झालेल्या दगडफेकीत सहा पोलीस कर्मचारी जखमी झाले असून, काही पोलीस वाहनांचेही नुकसान झाले आहे, यासंदर्भात जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. भीमाशंकर गुळेद यांनी प्रसारमाध्यमांना माहिती देताना सविस्तर तपशील सांगितले.
यमकनमर्डी पोलीस स्थानकाच्या व्याप्तीत येणाऱ्या हत्तरगी टोलनाक्याजवळ शेतकरी बांधवांचे आंदोलन सुरू होते. उड्डाणपुलाच्या खाली शेतकरी आंदोलन करत होते, तर काही लोक फ्लायओव्हरवर बसले होते. रस्ता खुला करण्यात यावा यासाठी पोलिसांकडून आंदोलकांना आवाहन करण्यात येत होते.
दरम्यान काही आंदोलक शेतकऱ्यांनी पोलिसांवर दगडफेक केली. यामध्ये अनेक पोलीस कर्मचारी जखमी झाले असून त्यांच्यावर तातडीने उपचार सुरू करण्यात आले आहेत. दगडफेक प्रकरणी परिस्थिती चिघळत असल्याचे लक्षात येताच पोलीस कर्मचारी तात्पुरते मागे हटले. यानंतर, शेतकरी नेत्यांना पाचारण करण्यात आले. पोलिसांनी शेतकरी नेत्यांना आवाहन केले की, त्यांनी शांततापूर्वक आंदोलन करावे आणि कायदा व सुव्यवस्था बिघडू नये. पोलिसांनी केलेल्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देऊन शेतकऱ्यांनी त्वरित महामार्ग खुला केला.

पोलीस विभाग शेतकरी बांधवांसमवेत आहे. यामुळे यापुढे देखील शेतकऱ्यांनी शांततापूर्वक आंदोलन करावे. जिल्हा प्रशासन, पोलीस विभाग आणि सरकार हे शेतकरी बांधवांसमवेतच आहे. शेतकऱ्यांनी सहकार्य केल्यास प्रशासन देखील शेतकऱ्यांचे सहकार्य करेल.
कोणत्याही कारणास्तव अशांतता माजू नये, शांतता प्रेरित मार्गाने आंदोलन करावे, चुकीच्या पद्धतीने आंदोलन करून वातावरण बिघडवू नये आणि कायदा हातात घेऊ नये, अशी विनंती पोलीस अधीक्षक डॉ. गुळेद यांनी केली.
ते पुढे म्हणाले की, शेतकरी आंदोलनात काही वाईट विचारांनी प्रेरित असलेल्या समाजकंटकांकडून देखील दगडफेक करण्यात आली असण्याची शक्यता आहे. टोल नाक्याच्या परिसरात जवळपास ५० सीसीटीव्ही कार्यरत आहेत. या प्रकरणी पुढील कारवाई केली जाईल. दगडफेकीत सहा पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत आणि काही पोलीस वाहनांचेही नुकसान झाले आहे. या संदर्भात अद्याप अधिकृत माहिती उपलब्ध झाली नाही, अशी माहितीही त्यांनी दिली.




