बेळगाव लाईव्ह : बेळगाव शहरातील शिवाजीनगर येथून जाणाऱ्या नाल्याच्या नूतनीकरण कामाचा भूमिपूजन समारंभ आज मंगळवारी सकाळी किल्ला तलावाच्या ठिकाणी उत्साहात पार पडला.
दरवर्षी पावसाळ्यात शिवाजीनगर येथे अरुंद असलेला नाला तुंबून पावसाचे पाणी माघारी येत असल्यामुळे जलमय, पूरग्रस्त परिस्थिती निर्माण होत असते. त्यामुळे शिवाजीनगर येथून जाणाऱ्या नाल्याची रुंदी वाढवून त्याचे नूतनीकरण केले जावे यासाठी नगरसेवक शिवाजी मंडोळकर यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक नागरिकांचे सातत्याने प्रयत्न सुरू होते.
त्यांच्या प्रयत्नांना अखेर यश आले असून बेळगाव उत्तरचे आमदार असिफ (राजू) सेठ यांच्या पुढाकाराने नाला रुंदीकरणाच्या कामाला मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे सदर विकास कामाचा भूमिपूजन समारंभ आज मंगळवारी सकाळी किल्ला तलावाच्या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता.
सदर कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून आमदार असिफ सेठ, नगरसेवक शिवाजी मंडोळकर व अन्य मान्यवर उपस्थित होते. विधिवत भूमिपूजनानंतर आमदार शेठ व नगरसेवक मंडोळकर यांच्या हस्ते कुदळ मारून नाल्याच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला. याप्रसंगी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
याप्रसंगी प्रसिद्धी माध्यमांना माहिती देताना नगरसेवक शिवाजी मंडोळकर यांनी दरवर्षी पावसाळ्यात शिवाजीनगर येथे जी पुराची समस्या निर्माण होत होती, तिचे निवारण करण्यासाठी या नाल्याचे रुंदीकरण, नूतनीकरण करण्यात येत असल्याचे स्पष्ट केले. सदर नाला अरुंद असल्यामुळे पावसाळ्यात पावसाच्या पाण्याचा निचरा न होता ते पुन्हा माघारी शिवाजीनगरमध्ये शिरत होते.
याखेरीज वेडावाकडा नाला हे देखील पूर परिस्थिती निर्माण होण्याचे एक कारण आहे. सदर नाला एका रेषेत सरळ आणि रुंद करावा यासाठी गेल्या काही वर्षांपासून आमचे सातत्याने प्रयत्न सुरू होते. त्याची दखल घेत आमची मागणी पूर्ण करण्याचे आश्वासन गेल्यावर्षी आमदार असिफ सेठ यांनी दिले होते.
त्या आश्वासनाची त्यांनी पूर्तता केली असून आज नाल्याच्या विकास कामाला गती मिळत आहे. या कामामुळे भविष्यात शिवाजीनगर, वीरभद्रनगर, पंजी बाबा या परिसरामध्ये पुराची परिस्थिती निर्माण होणार नाही, असे आम्हाला वाटते. या विकास कामासाठी आम्हाला राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाची देखील परवानगी घ्यावी लागली. मागील वर्षी या परवानगीसाठी अर्ज केला होता.
त्याची दखल घेत गेल्या एक-दीड वर्षानंतर सर्व सर्वेक्षण, तपासणी करून प्राधिकरणाने आम्हाला परवानगी दिली असे सांगून आमदार शेठ यांनी आपल्या आमदार फंडातून किल्ला तलावाच्या विकाससाठी 8 कोटी रुपयांचा निधी दिल्याबद्दल मंडोळकर यांनी त्यांना धन्यवाद दिले. आमच्या या किल्ला तलावाच्या सुशोभीकरणांमध्ये स्पीड बोटिंग आणि खाऊ कट्ट्याची देखील भर पडावी असा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठीही आमदारांनी आश्वासन दिले आहे, अशी माहिती नगरसेवक शिवाजी मंडोळकर यांनी दिली.


