बेळगाव लाईव्ह : राजधानी दिल्लीमध्ये झालेल्या भीषण बॉम्बस्फोटाच्या पार्श्वभूमीवर, खबरदारीचा उपाय म्हणून बेळगाव शहर पोलीस विभागाने ‘हाय अलर्ट’ घोषित केला आहे. शहर पोलीस आयुक्त भूषण गुलाबराव बोरसे यांच्या थेट आदेशानुसार, बेळगावातील सार्वजनिक ठिकाणी आणि महत्त्वाच्या आस्थापनांवर सुरक्षा व्यवस्था मोठ्या प्रमाणावर कडक करण्यात आली आहे.
शहर पोलीस आयुक्तांच्या निर्देशानुसार, बेळगाव रेल्वे स्टेशन आणि विमानतळ अशा प्रमुख ठिकाणी कसून तपासणी मोहीम राबवली जात आहे. बॉम्ब निकामी करणारे पथक, प्रशिक्षित श्वान पथक आणि पोलीस कर्मचारी रेल्वे स्टेशन भागाची बारकाईने तपासणी करत आहेत.
प्रवाशांचे सर्व सामान, तसेच विश्रांती कक्ष आणि संपूर्ण परिसराची कसून तपासणी केली जात आहे. पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनी या वाढलेल्या सुरक्षा व्यवस्थेबद्दल आणि नागरिकांनी सतर्क राहण्याबद्दल माहिती दिली आहे.





