बेळगाव लाईव्ह :चालकाला अचानक फिट आल्यामुळे एक शालेय बस रस्त्याशेजारी दुचाकी घेऊन थांबलेल्या दोघा जणांना धडक देऊन शाळेच्या भिंतीला जाऊन आदळल्याची घटना आज शुक्रवारी सायंकाळी हालगा येथे घडली.
या घटनेत दोघेजण जखमी झाले असून अपघातातील दोघा जखमी दुचाकीस्वारांना हिरेबागेवाडी पोलिसांनी उपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केले आहे. सुदैवाने या बस मध्ये कुणीही विद्यार्थी प्रवास करत नव्हते त्यामुळे धोका टळला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार हालगा येथील एका खाजगी शाळेची बस विद्यार्थ्यांना त्यांच्या घरी सोडून माघारी शाळेकडे परतत होती. तथापि शाळेजवळ येतात बस चालकाला अचानक फिट (मृच्छा) आली. परिणामी चालकाचे नियंत्रण सुटलेल्या बसने रस्त्याशेजारी आपल्या वाहनांसह थांबलेल्या दुचाकीस्वारांना ठोकून पुढे शाळेच्या आवार भिंतीला धडक दिली.

अचानक घडलेल्या या घटनेमुळे रस्त्यावर एकच धावपळ उडाली. आसपासच्या नागरिकांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना सावरून त्यांची विचारपूस केली. यावेळी घटनास्थळी बघ्यांची गर्दी झाली होती. दरम्यान सदर घटनेची माहिती मिळताच तात्काळ घटनास्थळी हजर झालेल्या हिरेबागेवाडी पोलिसांनी रुग्णवाहिका मागून जखमी दुचाकीस्वारांना उपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटलकडे धाडले.
सदर घटना परिसरात चर्चेचा विषय झाली होती. बसमध्ये मुले असताना हालगा येथून जाणाऱ्या महामार्गावर ही घटना घडली असती तर मोठा अनर्थ झाला असता, असे मत व्यक्त केले जात असून संबंधित शाळा प्रशासनाने सदर घटनेची गांभीर्याने दखल घेण्याची गरज व्यक्त केली जात आहे.


