बेळगाव लाईव्ह : मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार यांच्यात मुख्यमंत्रीपदाच्या मुद्द्यावरून मतभेद तीव्र झाल्याची चर्चा काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात होती. या पार्श्वभूमीवर दोघांनी शनिवारी एकत्र बैठकीत पक्षात संघभावनेने काम करण्याचा निर्णय जाहीर केला आहे.
यावर प्रतिक्रिया देताना बेळगावचे पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली असून ते लवकरच पक्षश्रेष्ठींना भेटून आपला अभिप्राय सादर करतील, असे सूतोवाच केले.
जारकीहोळी म्हणाले की, मुख्यमंत्री–उपमुख्यमंत्री यांच्यातील ‘वादा’बाबत संभ्रम निर्माण झाला होता. तो दूर करणे आवश्यक होते. पक्षश्रेष्ठींनी दोन्ही नेत्यांना संवाद साधण्याचे आवाहन केले होते आणि त्यानुसार चर्चा झाली आहे. या चर्चेचा अहवाल पक्षश्रेष्ठींकडे जाईल आणि त्यांचा निर्णय अंतिम राहील.
“पक्ष संघटित राहणे सर्वात महत्त्वाचे आहे,” असेही जारकीहोळी यांनी ठामपणे सांगितले.



