बेळगाव लाईव्ह : बेळगाव आरटीओ सर्कल येथील पंचवटी श्री सोन्यामारुती मंदिरामध्ये कार्तिक अमावस्यानिमित्त आज गुरुवारी आयोजित महाप्रसाद वितरणाचा कार्यक्रम उस्फुर्त प्रतिसादात भक्तीभावाने पार पडला. महाप्रसादाचा हजारो भाविकांनी लाभ घेतला.
शहरातील ऐतिहासिक आरटीओ क्रांतिवीर संगोळी रायण्णा चौकातील पंचवटी श्री सोन्यामारुती मंदिरामध्ये कार्तिक अमावस्यानिमित्त आज गुरुवारी महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. बेळगावातील जागृत आणि ऐतिहासिक श्री पंचवटी सोन्यामारुती मंदिरामध्ये गेल्या सुमारे 150 वर्षापासून कार्तिकोत्सव साजरा करण्यात येतो. त्यानिमित्त दरवर्षीप्रमाणे आज दुपारी भक्तांना महाप्रसाद वितरित केला गेला.
याप्रसंगी अधिक माहिती देताना मंदिराचे पुरोहित श्रीधर परशराम अनगोळकर यांनी सांगितले की, गेल्या 150 वर्षापासून आमचे घराणे या श्री सोन्यामारुती मंदिराची सेवा करत आहे. मंदिरामध्ये दरवर्षी कार्तिकोत्सव साजरा केला जातो.
या उत्सवाच्या निमित्ताने आज दुपारी महाप्रसाद वाटप करण्यात येत असून सायंकाळी लक्ष दीपोत्सवाचा कार्यक्रम होणार आहे. दरवर्षी सुमारे 7000 भाविक आमच्या मंदिराच्या महाप्रसादाचा लाभ घेत असतात. यामध्ये चव्हाट गल्ली, शिवाजीनगर, पोलीस हेडकॉर्टर्स, गांधीनगर वगैरे संपूर्ण शहरातील भाविकांचा समावेश असतो अशी माहिती देऊन आज सकाळी 6 वाजल्यापासून महाप्रसाद तयार करण्यास सुरुवात झाल्याचे पुरोहित अनगोळकर यांनी सांगितले.


