बेळगाव लाईव्ह :रोटरी क्लब ऑफ बेळगाव मिड टाउनतर्फे गेल्या 26 वर्षांपासून दहावीतील विद्यार्थ्यांसाठी यशस्वीपणे घेण्यात येणारी ‘रोटरी बेस्ट स्टुडंट’ किताबासाठीची खुली स्पर्धा यंदा येत्या शनिवार दि. 22 आणि रविवार दि. 23 नोव्हेंबर 2025 रोजी सेंट मेरीज हायस्कूल, कॅम्प-बेळगाव येथे आयोजित करण्यात आली आहे.
सदर स्पर्धा कन्नड, इंग्रजी आणि मराठी माध्यमातील विद्यार्थ्यांसाठी खुली आहे. विद्यार्थ्यांच्या अभ्यासाबरोबरच सहशालेय व उपक्रम आधारित विविध स्पर्धांचे आयोजन करून प्रत्येक माध्यमातील ‘रोटरी बेस्ट स्टुडन्ट अर्थात रोटरी उत्तम विद्यार्थी’ निवडले जातील. त्यानंतर सर्व माध्यमांमधून एक ‘सर्वोत्कृष्ट विद्यार्थी’ घोषित केला जाईल.
स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट विद्यार्थ्यास रु. 10,000 रोख, प्रमाणपत्र, ट्रॉफी आणि इतर अनेक बक्षिसे दिली जातील. तसेच प्रत्येक माध्यमातील उत्तम विद्यार्थ्यास रु. 3,000 रोख, प्रमाणपत्र, ट्रॉफी आणि इतर बक्षिसे प्रदान केली जातील. याव्यतिरिक्त प्रत्येक माध्यमातील दोन विद्यार्थ्यांना समर्पक पारितोषिक म्हणून रु. 1,000 रोख, प्रमाणपत्र, पदक आणि इतर बक्षिसे दिली जातील. सहभागी सर्व विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र, पदक, टी-शर्ट, पेन, लेखनपॅड आणि चॉकलेटची बाटली देण्यात येईल.
स्पर्धेदरम्यान सर्व विद्यार्थ्यांसाठी भोजन, अल्पोपहार आणि चहाची व्यवस्था करण्यात आली असून शनिवारी 22 नोव्हेंबर रोजी दुपारी 2 वाजता स्पर्धेला सुरुवात होईल. प्रथम 60 प्रश्नांची बहुपर्यायी लेखी परीक्षा घेतली जाईल, जी तिन्ही माध्यमांसाठी समान असेल. त्यानंतर 20 गुणांची निबंध लेखन स्पर्धा होईल.
दुसऱ्या दिवशी 23 नोव्हेंबर रोजी सर्व सहभागी विद्यार्थ्यांची वैयक्तिक मुलाखत, वैयक्तिक कौशल्यांचे मूल्यमापन, स्व-परिचय फेरी, स्मरणशक्ती चाचणी तसेच शालेय पातळीवरील विविध यश सिद्ध करणाऱ्या प्रमाणपत्रांची पडताळणी केली जाईल. या सर्व बाबींमधील गुण एकत्र करून तीनही माध्यमांमधून एक सर्वोत्तम विद्यार्थी निवडला जाईल. तसेच प्रत्येक माध्यमातील एक उत्तम विद्यार्थीही घोषित केला जाईल.
सदर स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ येत्या रविवार दि. 21 डिसेंबर 2025 रोजी होणाऱ्या गौरव सोहळ्यात प्रदान केली जातील. या भव्य कार्यक्रमाला कुंदापुर सुजन्ना एज्युकेशन ट्रस्ट, सोल्मेट्स व्हेट, एडीएमएस ई-बाईक्स, इफिशियंट डेव्हलपर्स, नियाझ हॉटेल इत्यादी अनेक संस्थांनी आर्थिक सहकार्य केले आहे. रोटरी क्लब ऑफ बेळगाव मिड टाउनचे अध्यक्ष रो. उदयसिंग राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली रो. उदय कुमार इदगुळी हे इव्हेंट चेअरमन म्हणून काम पाहत आहेत. क्लबचे सचिव रो. नंदन बागी, युवा सेवा संचालक रो. गिरीश बुरुडकट्टी, सह-अध्यक्ष रो. एम. एम. जाधव आणि इव्हेंट सेक्रेटरी रो. नटराज पाटील तसेच क्लबचे सर्व सदस्य उपरोक्त स्पर्धा व कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेत आहेत.




