बेळगाव लाईव्ह :बेळगाव तालुक्यातील कित्तूर राणी चन्नम्मा मिनी प्राणिसंग्रहालयात ३९ पैकी तब्बल ३१ काळवीटांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, याचा अहवाल अखेर समोर आला आहे. बेंगळुरू येथील बनशंकरी राष्ट्रीय उद्यानातील (बन्नेरुघट्टा) विषाणू तज्ज्ञ डॉ. चंद्रशेखर यांनी दिलेल्या माहितीनुसार हिमोरेजिक सेप्टिसेमिया (HS) या जीवाणूजन्य संसर्गामुळे काळवीटांचा मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले आहे.
बन्नेरुघट्टा राष्ट्रीय उद्यानातील तज्ज्ञ डॉक्टरांच्या उपस्थितीत काळवीटांची मरणोत्तर तपासणी करण्यात आली. त्यात त्यांच्या शरीरात HS जीवाणूचा संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाले. अचानक तापमानात झालेली घट, ताणतणाव आणि प्रतिकारशक्ती कमी होणे यांसारखे घटकही मृत्यू वाढण्यास कारणीभूत ठरल्याची माहिती समोर आली आहे.
सध्याच्या स्थितीत उर्वरित ७ काळवीटांवर अत्यंत निगराणीखाली उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले आहे.
प्राणिसंग्रहालयात सध्या वाघ, सिंह, बिबटे, अस्वले, कत्तल कुरी, तसेच विविध प्रकारच्या हरीण-जातीय प्राण्यांचा समावेश असल्याने या जीवाणूजन्य संसर्गाचा धोका लक्षात घेऊन तत्काळ आपत्कालीन प्रोटोकॉल लागू करण्याच्या सूचना तज्ज्ञांनी दिल्या आहेत.
प्राणी संग्रहालयातील प्रत्येक प्राण्याचे विलगीकरण करण्यात आले असून प्राणी संग्रहालय अलर्ट मोडवर आहे.
प्राणिसंग्रहालय प्रशासनाने काळजीचा इशारा देत योग्य ती पावले उचलण्यास सुरुवात केली असून, संसर्गाचा फैलाव रोखण्यासाठी सर्व विभागांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.


