बेळगाव लाईव्ह :बेळगावचे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते व पर्यावरणवादी डॉ. शिवाजी कागणीकर यांना राणी चन्नम्मा विद्यापीठाने मानद डॉक्टर पदवी जाहीर केली आहे.
बेळगावमध्ये आज सोमवारी सकाळी आयोजित पत्रकार परिषदेमध्ये राणी चन्नम्मा विद्यापीठाचे (आरसीयु) उपगुलगुरू सी. एम. त्यागराज यांनी उपरोक्त माहिती दिली. बेळगाव सुवर्ण विधानसौध येथे उद्या मंगळवारी आयोजित राणी चन्नम्मा विद्यापीठाच्या 14 व्या वार्षिक पदवीदान सोहळ्यात प्रमुख पाहुणे राज्यपाल थावरचंद गहलोत यांच्या हस्ते शिवाजी कागणीकर यांना डॉक्टरेट पदवी प्रदान करून गौरविण्यात येणार आहे.
बेळगाव तालुक्यातील कट्टणभावी, निंगेनहट्टी, कडोली वगैरे सारख्या ग्रामीण प्रदेशामध्ये 2 लाख झाडे लावून त्यांचे संवर्धन करण्याबरोबरच मोठ्या प्रमाणात जलसंवर्धन करणे. दुर्गम जंगल प्रदेशातील मुलांना सुशिक्षित करण्याबरोबरच निरिक्षर लोकांना साक्षर करण्याचे महत्वपूर्ण कार्य डॉ. शिवाजी कागणीकर करत आहेत.
या पद्धतीने गेल्या अनेक वर्षांपासून आपली सामाजिक बांधिलकी निष्ठेने पार पाडणाऱ्या कागणीकर यांच्या प्रेरणादायक कार्याची दखल घेऊन राणी चन्नम्मा विद्यापीठाकडून त्यांना प्रतिष्ठेची डॉक्टरेट पदवी प्रदान केली जाणार आहे, असे उपकुलगुरू त्यागराज यांनी स्पष्ट केले.


