बेळगाव लाईव्ह : राणी कित्तूर चन्नम्मा छोट्या प्राणीसंग्रहालयात दूषित पाणी पिल्यामुळे अंदाजे १० पेक्षा अधिक हरणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या घटनेची गंभीर दखल घेत राज्याचे वनमंत्री ईश्वर खंड्रे यांनी तात्काळ चौकशीचे निर्देश दिले आहेत.
काही दिवसांपूर्वीच संग्रहालयातील हरणे किटाणूयुक्त पाणी प्राशन केल्याने मृत्यूमुखी पडत आहेत, अशी प्राथमिक माहिती समोर आली या तक्रारी मंत्री ईश्वर खंड्रे यांच्या निदर्शनास येताच हरिण मृत्यूप्रकरणी चौकशी सुरू करण्याचे आदेश त्यांनी दिले.
🕵♂️ माहिती लपवण्याचा आरोप?
या संदर्भात तपशील मिळवण्यासाठी विभागीय वनाधिकारी पवन कुरनिंग यांच्याशी सतत संपर्क साधला गेला, मात्र त्यांनी माहिती देण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप असून त्यामुळे संशय अधिक गडद झाल्याची चर्चा आहे.
📌 नागरिकांचे प्रश्न
🔸 प्राणीसंग्रहालयात हरणांसाठी पुरवलेले पाणी तपासले जाते का?
🔸 मृत झालेल्या हरणांचे पोस्टमॉर्टेम अहवाल जाहीर होणार का?
🔸 निष्काळजीपणा सिद्ध झाल्यास जबाबदार अधिकारी/कर्मचाऱ्यांवर कारवाई होणार का?
⚠️ पुढील कार्यवाहीची अपेक्षा
वन विभागाकडून या प्रकरणात तपास पथक नेमले जाण्याची शक्यता असून दोषींवर कारवाई होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.





