बेळगाव लाईव्ह : “अथणी सहकारी निवडणुकीत सवदींच्या दुखऱ्या जागेवर मी हात ठेवला आहे. लहान मुलाला जशी पोटदुखी झाली की तो आरडाओरडा करतो, तसाच सवदींचा प्रकार झाला आहे. २०२८ मध्ये लक्ष्मण सवदींना हरवूनच दाखवणार,” अशी शपथ माजी मंत्री रमेश जारकिहोळी यांनी घेतली.
सोमवारी बेळगाव शासकीय विश्राम धामात येथे पत्रकार परिषदेत ते बोलत होते. “अथणी सहकारी क्षेत्रात आम्हाला पराभव होईल हे आधीच माहीत होते. कृष्णा सहकारी क्षेत्रात सवदींनी १८ हजार मतांतून केवळ साडेपाच हजार मतांवर विजय मिळवला, याबद्दल कोणीच प्रश्न विचारत नाही,” असा टोला जारकिहोळी यांनी लगावला.
ते पुढे म्हणाले, “रमेश कत्ती अजूनही माझा आत्मीय मित्र आहे. आमच्यात कोणतेही वैमनस्य नाही. मात्र वाल्मिकी समाजाबद्दल त्यांनी केलेले वक्तव्य अयोग्य होते. त्यांनी आपली भाषाशैली बदलावी, अन्यथा राजकारणात फटका बसू शकतो,” असा सल्ला त्यांनी दिला.
काँग्रेसविषयी बोलताना जारकिहोळी म्हणाले, “काँग्रेसमध्ये नोव्हेंबर क्रांतीबाबत आमचेच लोक चर्चा का करत आहेत हे समजत नाही. डी.के. शिवकुमार मुख्यमंत्री होवोत किंवा सिद्धरामय्याच पुढे राहोत, आम्हाला काही फरक पडत नाही. आम्ही विरोधी पक्ष म्हणून आपले काम करत राहू.”
विजयपूरचे आमदार बसनगौडा पाटील यांच्या पक्षातून हकालपट्टीनंतर ते पुन्हा भाजपमध्ये यावेत, अशी माझी इच्छा असल्याचे जारकिहोळी म्हणाले. “विजयेंद्र पुढे आले तरच वेगळा पक्ष तयार होईल, असे त्यांनी सांगितले आहे. यत्नाळ यांची हकालपट्टी होऊन आठ महिने झाले, ते राजकारणात वर आले आहेत; विजयेंद्र मात्र खाली गेले आहेत. हे हायकमांडने गांभीर्याने घ्यावे,” असेही त्यांनी म्हटले.
“भाजपसाठी कोणीही अपरिहार्य नाही. यत्नाळ मोठ्या प्रमाणात उभे राहत आहेत, पण भाजपने त्यांना गमावू नये,” अशी सूचना त्यांनी केली.
ते म्हणाले, “आम्ही कधीही यडियुरप्पांविरोधात बोललो नाही. मात्र विजयेंद्र यांच्या कारभारामुळे भाजपचे नुकसान होत आहे, हे आम्हालाही वेदनादायक आहे. या विषयावर आम्ही माध्यमांसमोर चर्चा करणार नाही.”
कस शेतकऱ्यांच्या आंदोलनाबद्दल बोलताना त्यांनी सांगितले, “
ऊसाबाबत योग्य समर्थनभाव जाहीर करण्यासाठी सरकारने लवकर निर्णय घ्यावा. शेतकऱ्यांना न्याय मिळालाच पाहिजे,” अशी मागणीही रमेश जारकिहोळी यांनी केली.




