बेळगाव लाईव्ह:बेळगावचे खासदार व कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर यांनी 18 नोव्हेंबर रोजी स्मार्ट सिटी मिशन आणि पर्यटन विभागाच्या अधिकाऱ्यांची सविस्तर बैठक घेऊन शहरातील प्रलंबित कामांवर सजगतेने चर्चा केली.
स्मार्ट सिटी मिशन कामांचा आढावा
स्मार्ट सिटी मिशनअंतर्गत मिळालेल्या रु. 990 कोटींपैकी 931 कोटींच्या निधीतून 104 कामे पूर्ण झाल्याची माहिती खासदारांना देण्यात आली. चार प्रमुख कामे मात्र अद्याप प्रलंबित आहेत.
तिलकवाडीत बांधण्यात आलेल्या कला मंदिरातील दुकाने वाटप न झाल्याबाबत खासदार शेट्टर यांनी नाराजी व्यक्त केली. पूर्ण झालेले बांधकाम वापरात नसल्यास ते नादुरुस्त होण्याचा धोका असल्याने तातडीने दुकाने वाटून देण्याचे त्यांनी आदेश दिले.
सी बी टीजवळील नवे बस स्थानक : हस्तांतरणाची प्रक्रिया प्रलंबित
सी बी टी (CBT) जवळ उभारलेले नवे बस स्थानक उद्घाटन झाले असले तरी ती जमीन कँटोन्मेंट बोर्डातून महापालिकेकडे अद्याप हस्तांतरित झालेली नाही.
ही बाब समोर आल्यानंतर खासदार जगदीश शेट्टर यांनी तात्काळ हस्तांतरणाची प्रक्रिया पूर्ण करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले.
अमृत योजनेतील कामे
केंद्राच्या ‘अमृत’ योजनेअंतर्गत शहरातील 7 तलावांचे पुनरुज्जीवन व उद्यानांचे नूतनीकरण रु. 24 कोटी खर्चाने करण्यात येत असल्याची माहिती देण्यात आली.
रस्त्यांची दुरवस्था : अधिवेशनाआधी सुधारणा करण्याचे आदेश
बेळगावातील अनेक रस्त्यांची अवस्था बिकट असल्याचे निदर्शनास आले.
आगामी हिवाळी अधिवेशन बेळगावात होणार असल्याने शहरातील रस्ते, वाहतूक व्यवस्थापन व स्वच्छता याकडे विशेष लक्ष देण्याचे खासदारांनी स्पष्ट निर्देश दिले.
‘VISHWAS’ योजना – रु. 135 कोटींचे काम रखडले
शहराच्या घनकचऱ्याच्या व्यवस्थापनासाठी केंद्राने मंजूर केलेले रु. 135 कोटींचे ‘VISHWAS’ प्रकल्प अद्याप सुरू झालेला नाही. काम का विलंबित आहे याचे स्पष्टीकरण मागवून तातडीने काम सुरू करण्याचे आदेश खासदार शेट्टर यांनी दिले.
नवीन STP प्रकल्पाचा विषय
बेळगावजवळ उभारण्यात येणाऱ्या नवीन Sewage Treatment Plant (STP) साठी जमिनीचे संपादन करण्याचा मुद्दाही बैठकीत चर्चिला गेला.
शेतकऱ्यांच्या मागणीनुसार अतिरिक्त भरपाई देण्याचा प्रस्ताव राज्य मंत्रिमंडळाने मंजूर केल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. शासन आदेश मिळताच प्रकल्प सुरू करण्याचे आश्वासन देण्यात आले.
सौंदत्ती– श्री रेणुका यल्लम्मा मंदिर विकासकामांना गती
पर्यटन विभागाच्या दुसऱ्या बैठकीत श्री रेणुका यल्लम्मा मंदिरात केंद्र सरकारकडून मंजूर रु. 118 कोटींच्या कामांचा आढावा घेण्यात आला.
निविदा प्रक्रियेसाठी फाईल वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे पाठविल्याचे कळल्यानंतर खासदार जगदीश शेट्टर यांनी पर्यटन विभागाच्या संयुक्त आयुक्तांना फोन करून निविदा मंजुरीची प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्याचे आदेश दिले.
मंदिराच्या संपूर्ण विकासासाठी केंद्र व मंदिर निधी मिळून एकूण 215 कोटींच्या कामांची वेळेत अंमलबजावणी करावी, असे स्पष्ट निर्देश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले.
बैठकीस मंदिर विकास प्राधिकरणाचे सचिव अशोक दुडगुंटे, पर्यटन मंडळाच्या आयुक्त गीता कौलगी, बेळगावचे पर्यटन उपसंचालक बडिगेर तसेच इतर अधिकारी उपस्थित होते.


