बेळगाव लाईव्ह :,अनगोळ बेळगाव येथून काल शनिवारी घरातून बेपत्ता झालेला झुवान शिप्पाच इनामदार हा 12 वर्षाचा मुलगा रेल्वे पोलिसांना सापडला असून तूर्तास त्यांनी त्याची रवानगी शिवाजीनगर येथील जिल्हा बालरक्षण केंद्र अर्थात बाल सुधारणा गृहात केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार बेळगाव रेल्वे स्थानकावर रेल्वे पोलिसांना एक मुलगा काल रात्री एकटाच संशयास्पदरित्या वावरताना आढळून आला. त्यांनी त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने पोलिसांना कोणतीच माहिती दिली नाही. त्यामुळे पोलिसांनी फोटो काढून त्याची रवानगी शिवाजीनगर येथील बाल सुधारणा गृहात केली.
दरम्यान रेल्वे स्थानकाच्या ठिकाणी ऑटोरिक्षाचालक असणाऱ्या झुआनच्या मामाला याबाबतची माहिती मिळताच त्याने रेल्वे पोलिसांशी संपर्क साधला. तेंव्हा पोलिसांनी रेल्वे स्थानकावर सापडलेल्या मुलाचा फोटो त्याला व्हाट्सअप केला. फोटोतील मुलगा हा आपला झुवानच असल्याची खातरजमा होताच रिक्षा चालक मामाने ती आनंदाची बातमी आपल्या बहिणीच्या घरी म्हणजे इनामदार कुटुंबीयांना कळविली.
आपला मुलगा सुरक्षितपणे सापडल्याची बातमी मिळताच इनामदार कुटुंबीयांचा जीव भांड्यात पडला असून त्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.
आज रविवार सुट्टीचा दिवस असल्यामुळे उद्या सोमवारी आवश्यक कागदोपत्री सोपस्कार पूर्ण करून झुवान इनामदार याला त्याच्या कुटुंबीयांकडे सुपूर्द केले जाणार आहे.




