बेळगाव लाईव्ह : बेळगावात पाळला गेलेला ‘काळा दिवस’ यंदा केवळ निषेधाचा नव्हे, तर मराठी माणसाच्या तळमळीचा आणि पिढ्यानपिढ्या चाललेल्या निर्धाराचा ऐतिहासिक क्षण ठरला. सीमाभागावर झालेल्या अन्यायाविरोधात निषेध व्यक्त करण्यासाठी निघालेल्या या विराट निषेध फेरीत हजारो मराठी बांधवांसोबत अवघ्या सहा महिन्यांचे बाळ सहभागी झाले होते.
या चिमुकल्याच्या सहभागातून ६९ वर्षांपूर्वी सुरू झालेला हा लढा आज केवळ राजकीय मागणी राहिलेला नाही, तर तो प्रत्येक मराठी कुटुंबाच्या अस्तित्वाची आणि भावनिकतेची लढाई बनला आहे, हे स्पष्ट होते. केंद्र सरकारची दडपशाही झुगारून रस्त्यावर उतरलेल्या चौथ्या पिढीने, सीमाभागाची महाराष्ट्रात सामील होण्याची तीव्र लोकेच्छा पुन्हा एकदा जगजाहीर केली आहे.
सीमाभागातील मराठी भाषिकांनी गेल्या ६९ वर्षांपासून सातत्याने पाळला जाणारा ‘काळा दिवस’ यंदाही मोठ्या गांभीर्याने आणि तीव्र निर्धाराने साजरा केला. केंद्र सरकारने भाषावार प्रांतरचनेत मराठी भाषिक जनतेवर केलेल्या अन्यायाविरोधात निषेध व्यक्त करत हजारो मराठी बांधवांनी काळी वस्त्रे आणि काळे झेंडे घेऊन शहरातून निषेध फेरी काढली.
दडपशाहीचे वातावरण, पोलिसांचा प्रचंड बंदोबस्त आणि कन्नड रक्षण वेदीकेच्या व्यत्ययाच्या धमक्या झुगारून मराठी जनतेने रस्त्यावर उतरत ‘सीमाभाग महाराष्ट्रातच सामील व्हायला हवा’ या आपल्या अटल निर्धाराचा पुनरुच्चार केला.
बेळगाव, कारवार, निपाणी, बिदर, भालकीसह संयुक्त महाराष्ट्राच्या मागणीसाठी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेतृत्वाखालील या निषेध फेरीला धर्मवीर संभाजी महाराज उद्यानातून प्रारंभ झाला. या फेरीत उतरलेल्या तरुणाई, महिला, मुले आणि ज्येष्ठ नागरिकांच्या प्रचंड सहभागातून महाराष्ट्रात सामील होण्याची तीव्र लोकेच्छा पुन्हा एकदा स्पष्ट झाली.. हा लढा अव्याहतपणे सुरू असून, मराठी भाषिकांच्या भावनिक हक्कांसाठी लढणारी ही चौथी पिढी आहे.
ही विराट निषेध सायकल रॅली महाद्वार रोड, तानाजी गल्ली, भांदूर गल्ली, टिळकचौक मार्गे शहापूरमधील गल्लीतून फिरून शामा प्रसाद मुखर्जी रोड मार्गे मराठा मंदिर येथे समाप्त झाली. यावेळी मराठा मंदिर येथे जाहीर सभेचेही आयोजन करण्यात आले होते.
यावेळी बोलताना महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पदाधिकाऱ्यांनी सीमा प्रश्नाच्या पुढील वाटचालीवर भर दिला. समितीचे खजिनदार प्रकाश मरगाळे यांनी माहिती दिली की, सीमा प्रश्नाची पुढील सुनावणी २१ जानेवारी २०२६ रोजी सर्वोच्च न्यायालयात होणार आहे.
कर्नाटकाचा ‘१२ अ’ अर्ज निकाली निघाल्यावर नियमित सुनावणी सुरू होईल. त्यामुळे महाराष्ट्र शासनाने केवळ बेळगावात प्रवेशबंदी करून न थांबता, सीमा समन्वयकांद्वारे केंद्रात प्रभावी पाठपुरावा करणे आणि सीमावासियांना योग्य वेळी प्रत्यक्ष पाठिंबा देणे अत्यावश्यक आहे. या सभेत माजी महापौर मालोजी अष्टेकर, माजी आमदार मनोहर किनेकर आणि रणजीत चव्हाण पाटील यांनीही मार्गदर्शन केले.
लोकशाही मार्गाने चाललेल्या या निषेध फेरीत व्यत्यय आणण्याचा प्रयत्न कन्नड रक्षण वेदीकेच्या कार्यकर्त्यांनी केला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हार घालून राज्योत्सव मिरवणूक सुरू करण्याचा हट्ट धरणाऱ्या या कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला. पोलिसांनी तत्काळ हस्तक्षेप करून संबंधितांना ताब्यात घेतले. दुसरीकडे, निषेध फेरी संपल्यावर महाराष्ट्र एकीकरण युवा समितीचे नेते शुभम शेळके यांना बेळगाव पोलिसांनी ‘सुरक्षा कारणास्तव’ ताब्यात घेऊन संकेश्वरच्या पुढे नेऊन सोडले. प्रशासनाने परवानगीच्या बाबतीत नेहमीप्रमाणे ‘खेळखंडोबा’ केला असला तरी, पोलीस प्रशासनाची दडपशाही झुगारून मराठी भाषिकांचा हा विराट मोर्चा ६९ वर्षांच्या इतिहासाप्रमाणे आजही यशस्वी ठरला.


