बेळगाव लाईव्ह : इंग्रजी माध्यमाचे वर्चस्व असलेल्या सनदी लेखापाल (सीए) च्या आव्हानात्मक परीक्षेत, केवळ मराठी माध्यमातून शिक्षण घेऊन आलेल्या अक्षता यल्लाप्पा पाटील (लग्नानंतरचे नाव: अक्षता अक्षय सांबरेकर) यांनी ३ नोव्हेंबर २०२५ रोजी नेत्रदीपक यश मिळवून मराठीचा झेंडा उंचावला आहे. त्यांची जिद्द, कष्ट आणि कौटुंबिक पाठबळ हीच त्यांच्या यशाची गुरुकिल्ली ठरली.
अक्षता यांचे प्राथमिक शिक्षण सरकारी शाळा नं. ३ आणि उच्च प्राथमिक शिक्षण महिला विद्यालय मराठी शाळेतून झाले. मराठी शाळेतून शिक्षण घेतल्यानंतरही त्यांनी ज्योती महाविद्यालयात वाणिज्य शाखेत प्रवेश घेतला. इथेच त्यांना अकौंटन्सी आणि कर प्रणाली या विषयांमध्ये विशेष रुची निर्माण झाली.
कॉलेजमध्ये आयोजित केलेल्या एका करिअर मार्गदर्शन परिषदेत त्यांना सनदी लेखापाल (सीए) व्यवसायाची माहिती मिळाली आणि याच क्षेत्रात करिअर करण्याचे स्वप्न त्यांनी पाहिले. या स्वप्नाला मूर्त स्वरूप देण्यासाठी त्यांनी २०१६ साली सीए परीक्षेसाठी नोंदणी केली.
सीएच्या या प्रवासात त्यांना अनेकवेळा अपयशाचा सामना करावा लागला. अभ्यास करूनही अपेक्षित यश मिळत नव्हते, मात्र त्यांनी कधीही माघार घेतली नाही. अथक परिश्रमामुळे अखेर २०२१ मध्ये त्यांनी आयपीसीसी स्तर पूर्ण केला.

२०२१ मध्ये लग्न झाल्यानंतर त्यांचा पुढील शिक्षणाचा मार्ग थांबला नाही, याचे संपूर्ण श्रेय त्यांच्या सासरच्या मंडळींना आणि माहेरच्यांना जाते. सासरच्या मंडळींनी त्यांच्यावर कोणतीही गृह जबाबदारी न टाकता, त्यांना शिक्षण पूर्ण करण्यासाठी पूर्ण स्वातंत्र्य दिले. विशेष म्हणजे, त्यांच्या आईने त्यांच्या दोन वर्षांच्या बाळाचा सांभाळ करण्याची महत्त्वपूर्ण जबाबदारी घेतली. जोडीदाराचा खंबीर पाठिंबा आणि आई-वडिलांचा आशीर्वाद मिळाल्याने अक्षता यांना आपल्या अभ्यासावर पूर्ण लक्ष केंद्रित करता आले. या सर्व पाठबळाच्या जोरावर, अक्षता यांनी आपले ध्येय साधले आणि ३ नोव्हेंबर २०२५ रोजी सीएच्या अंतिम परीक्षेत उत्तीर्ण होऊन सनदी लेखापाल म्हणून यश मिळवले.
या संपूर्ण प्रवासात त्यांना सीए सतीश मेहता आणि बीपी जनगौडा यांचे अमूल्य मार्गदर्शन लाभले. अक्षता सांबरेकर यांचे हे यश मराठी माध्यमातून शिक्षण घेऊन उच्च व्यावसायिक परीक्षांमध्ये करिअर करू इच्छिणाऱ्या लाखो तरुणांसाठी दीपस्तंभासारखे आहे.





