बेळगाव लाईव्ह : “मराठी, बाल आणि साहित्य या तीन शब्दांशी मैत्री करायला लावायला हवी. प्रत्येक मुलामध्ये एक असामान्य कला असते, ती कला शिक्षक आणि पालकांनी ओळखणे गरजेचे आहे,” अशा शब्दांत निवृत्त प्राध्यापक मृणाल पर्वतकर यांनी बालसाहित्याचे महत्व स्पष्ट केले.
गुरुवर्य वि. गो. साठे मराठी प्रबोधनीच्या वतीने कॉ. कृष्णा मेणसे साहित्य नगरीत २५ वे मराठी बाल साहित्य संमेलन साहित्यप्रेमी आणि विद्यार्थ्यांच्या प्रचंड उपस्थितीत आज मोठ्या उत्साहात संपन्न झाले. विविध शाळांतील विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे हे संमेलन खचाखच भरलेल्या सभागृहात यशस्वी ठरले.
मुंबईचे उद्योजक दीपक पर्वतकर यांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन करण्यात आले.
या संमेलनाची सुरुवात ग्रंथदिंडीने झाली. मराठी विद्यानिकेतनपासून गोगटे रंगमंदिरपर्यंत ग्रंथदिंडी काढण्यात आली. संमेलनादरम्यान विद्यार्थ्यांनी आपली साहित्य प्रतिभा प्रभावीपणे सादर केली, ज्यात सीमाप्रश्नावर सादर झालेली कविता लक्षवेधी ठरली. या कवितेतून सीमाप्रश्नाची तळमळ नव्या पिढीच्या साहित्यातून तीव्रपणे उमटत असल्याचे दिसून आले.
संमेलनाच्या चार सत्रांपैकी पहिले सत्र कथाकथनाचे होते, ज्यात निवडक कथाकारांनी कथा सादर केल्या. यात खानापूर येथील सई यादव (ताराराणी हायस्कूल) सह अथर्व गुरव (तडशिनहाळ), आराध्या शिवणगेकर (शिवणगे), मनाली बराटे (मराठी विद्यानिकेतन), समृद्धी सांबरेकर (महिला विद्यालय बेळगाव), श्रध्दा पाटील (सरकारी मराठी शाळा निलजी) यांचा समावेश होता.
दुसऱ्या सत्रात कवी संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. या सत्रात सीमाभागातील विविध शाळांतील विद्यार्थ्यांनी आपल्या स्वरचित कविता सादर करून रसिकांची मने जिंकली. यातूनच सीमाप्रश्नाचा इतिहास आणि वर्तमान यावर आधारित प्रभावी कविता एका विद्यार्थिनीने सादर केली आणि ती विशेष गाजली. इंटरनेट आणि सोशल मीडियाच्या जगातही विद्यार्थ्यांची साहित्य प्रतिभा वाखाणण्याजोगी आहे, हे कथाकथन आणि कवी संमेलनात सिद्ध झाले. या संमेलनात महाराष्ट्रातील चंदगड भागातील शालेय विद्यार्थ्यांनीही सहभाग नोंदविला.
तिसऱ्या सत्रात पुण्याचे नाट्यकलाकार यांनी ‘मधली सुट्टी’ हे बालनाट्य सादर केले. मुलांच्या पोषण आहारासंबंधी जागरूकता निर्माण करणारे हे नाटक होते.
चौथ्या सत्रात संमेलनाध्यक्ष मृणाल पर्वतकर यांचे भाषण झाले. यावेळी त्यांनी मोलाचे मार्गदर्शन केले.

“मुलांशी पालकांनी आणि शिक्षकांनी संवाद साधायला हवा. कलामूल्य असलेले लिखाण म्हणजे साहित्य, तर लहान मुलांना नजरेसमोर ठेवून लिहिलेले असते ते बालसाहित्य. शब्द आणि साहित्याची ओळख नसताना आईच्या अंगाईतूनच बाल साहित्याची पहिली ओळख होते. मराठी साहित्यात अवीट गोडीची आणि अजरामर गीते आहेत. अनुवादित बालसाहित्याची पुस्तके महत्त्वाची आहेत,” असे मौलिक विचार मृणाल पर्वतकर यांनी मांडले.
“मराठी भाषेच्या संवर्धनासाठी वि. गो. साठे मराठी प्रबोधिनी आणि मराठी विद्यानिकेतन तळमळीने कार्यरत आहे. मराठी साहित्य समृद्ध आहे. मुलांमध्ये असलेले सुप्त कलागुण शिक्षक आणि पालकांनी ओळखणे गरजेचे आहे. अशा कला बाहेर येणे गरजेचे आहे,” असे आवाहन त्यांनी केले.
याच सत्रात प्रबोधिनीतर्फे घेण्यात आलेल्या मराठी व्याकरण व सुंदर हस्ताक्षर स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थ्यांना बक्षीस देऊन गौरविण्यात आले. प्रत्येक कविता आणि कथाकथनाला साहित्यप्रेमींनी भरभरून दाद दिली.
यावेळी प्रबोधिनीचे अध्यक्ष जयंत नार्वेकर, सचिव सुभाष ओऊळकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.





